fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

इंटरनॅशनल पेन फेस्टीवलमध्ये जगविख्यात पेन पाहण्याची संधी

विंटेज व महागडया पेनचे प्रदर्शन ; दिनांक ११ व १२ डिसेंबर रोजी विनामूल्य आयोजन

पुणे : पार्कर, वॉटरमन, मॉन्टब्लँक जर्मनी, वॉल्डमन, शेफस, मॉन्टव्हदे, स्क्रिक्स टर्की, लॅमी  जर्मनी, पायलट, प्लॅटिनम, फ्लेक्सबुक ग्रीस, लिओनार्डो, मॅग्ना कार्टा या आणि अशा जगविख्यात तब्बल १ हजारापेक्षा अधिक पेनचे प्रदर्शन पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. पुण्यामध्ये इंटरनॅशनल पेन फेस्टीवलचे आयोजन व्हिनस ट्रेडर्सतर्फे करण्यात आले आहे. दिनांक ११ आणि १२ डिसेंबर रोजी सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत आपटे रस्त्यावरील हॉटेल रामी ग्रँड येथे पेन फेस्टीवल होणार असून  सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश आहे, अशी माहिती आयोजक सुरेंद्र करमचंदानी यांनी दिली.

इंटरनॅशनल पेन फेस्टीवलचे उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. यावेळी फ्लेअर पेनचे चेअरमन खुबीलाल राठोड, कुमार प्रॉपर्टीजचे केवलकुमार जैन, न्युरोलॉजिस्ट डॉ. राजस देशपांडे, पीएनजीचे सौरभ गाडगीळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. फेस्टीवलमध्ये २०० रुपयापासून ते ४ लाख रुपये किमतीचे पेन पाहता येणार आहेत. फाउंटन पेन, बॉल पेन, रोलर पेन, मल्टीफंक्शनल पेन, कॅलिग्राफी पेन,यांत्रिक पेन्सिल, शाईची विविध ५०० श्रेणी पेन फेस्टीवलमध्ये पाहायला मिळणार आहे.
सुरेंद्र करमचंदानी म्हणाले, आजच्या डिजीटल युगात फाऊंटन पेनच्या वापराला प्रोत्साहन मिळावे आणि फाऊंटन पेनाने लेखनाचा आनंद घेता यावा, यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जगभरातील विविध प्रकारचे पेन पुणेकरांना पाहता व खरेदी देखील करता येणार आहेत.
यासोबतच ५ लाख मराठी स्वाक्षरी करणारे आणि मराठी स्वाक्षरीची जागृती करणारे कलाशिक्षक गोपाल वाकोडे उपस्थित राहून यावेळी प्रात्यक्षिके दाखविणार आहेत. तसेच प्रा.यशवंत पिटकर यांचे फाऊंटन पेन याविषयावर  अनौपचारिकपणे उपस्थितांशी संवाद  होणार आहे. भारताच्या विविध भागांतून पेन विक्रेते, पेन संग्राहक या फेस्टिवलमध्ये सहभागी होणार असून पुणे आणि परिसरातील पेन प्रेमींनी देखील आवर्जून भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading