fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

‘महागाई’वरील रांगोळ्यांतून व्यक्त झाल्या पुणेकरांच्या भावना

पुणे : पेट्रोल-डिझेलचा उडालेला भडका, गॅस सिलेंडरमधील दरवाढ, गृहिणींचे कोलमडले बजेट, आरोग्य-शिक्षणाच्या महागल्या सुविधा, महागाईमुळे पिचलेला सामान्य माणूस, महिला-शेतकरी-नोकरवर्ग यांना होणार त्रास रांगोळीतून प्रतिबिंबित झाला. निमित्त होते, अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहांतर्गत आयोजित महागाईवरील रांगोळी प्रदर्शन व स्पर्धेचे!
घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक केंद्रातील आर्ट गॅलरी, बाळासाहेब ठाकरे कलादालन, बालगंधर्व कलादालन येथे हे प्रदर्शन भरविण्यात आले होते. बुधवारी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांच्या हस्ते प्रदर्शनातील उत्कृष्ट रांगोळींना बक्षिसे देण्यात आली. यावेळी ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हासदादा पवार, सप्ताहाचे संयोजक मोहन जोशी, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश काँग्रेसचे संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, नगरसेविका लता राजगुरू, महिला अध्यक्षा संगीता तिवारी, कल्याणी साळुंके, भागुजी शिखरे, रफिक शेख, शाबीर खान, अयुब पठाण आदी उपस्थित होते.
या रांगोळी स्पर्धेत भाग्यश्री देशपांडे प्रथम, गौरी रोठे द्वितीय, मयूर दुधाळ तृतीय, तर ज्ञानेश्वरी कोतली, रचना गवळी, पूनम पोटे, महेंद्र मेटकरी यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. प्रथम क्रमांकास ७०००/- द्वितीय क्रमांकास ५०००/- तृतीय क्रमांकास ३०००/- व उत्तेजनार्थ प्रत्येकी १०००/- रुपये रोख पारितोषिक व प्रशस्तिपत्रक देण्यात आले.
विवेक वेलणकर म्हणाले, “महागाईमुळे देशातील जनतेला जगणेही महाग झाले आहे. चित्रकलेच्या, रांगोळीच्या माध्यमातून सामान्य माणसांच्या महागाईविषयीच्या तीव्र भावना रेखाटलेल्या आहेत. पेट्रोल, डिझेलसह अन्य वस्तूंच्या वाढलेल्या किंमती सामान्यांसाठी अन्यायकारक आहेत. केंद्र व राज्य सरकारने महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.”
उल्हास  पवार म्हणाले, “रांगोळी, चित्रांतून विविध विषयांना हात घातला आहे. एक तासाच्या भाषणापेक्षा एकेक रांगोळी बोलकी आहे. महागाईने जनसामान्य त्रासलेला असताना केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी केवळ उत्सव साजरे करण्यात दंग आहेत. महागाई कमी करून सामान्यांना दिलासा देण्याचे काम मोदींनी करावे व अच्छे दिन प्रत्यक्षात आणावेत.”
मोहन जोशी म्हणाले, “सप्ताहाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकांना जोडण्याचे काम करत आहोत. सामान्य माणूस महागाईचे चटके सहन करत आहे. महागाईच्या या संकटातून बाहेर पडण्यासाठी काँग्रेसला पुन्हा आणण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला ‘अच्छे दिन’चे दिवास्वप्न दाखवले. ते खोटे ठरले. रांगोळी स्पर्धेतून कलाकारांना व्यक्त होण्यास वाव मिळाला.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading