fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsPUNE

बेकायदेशीरपणे घरगुती सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस रिफिलिंग गॅसचा स्फोट

दुर्घटनेला सत्ताधारी जबाबदार असल्याची माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांची टीका
पिंपरी  : पिंपळे गुरव येथील मोरया पार्क गल्ली क्रमांक पाचमध्ये जांभुळकर चाळीत बुधवारी दुपारी बेकायदेशीरपणे घरगुती सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस रिफिलिंग करताना गॅस गळती झाल्याने मोठा स्फोट झाला. यामध्ये दोनजण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या दुर्घटनेला सत्ताधारी जबाबदार असल्याची टीका माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केली आहे.
पिंपळे गुरवमधील मोरया पार्क येथील जांबुळकर चाळीमध्ये भारत गॅस एजन्सीचे रमेश मनाराम व कुमार दिलीप सुकाराम घरगुती सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये बेकायदेशीर गॅस भरत असताना गॅस गळती होऊन हा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी की घराच्या खिडक्या फुटल्या व भिंतीना तडे जाऊन भिंती एका बाजूला कलल्या गेल्या आहेत. घराचा दरवाजाही पंधरा ते वीस फूट लांब उडून पडला गेला.
या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच भाडेकरू असल्याची पोलीस ठाण्यात नोंद केली नसेल, तर घरमालकावरही गुन्हा दाखल केला जाईल, असे सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे यांनी सांगितले.
अरुंद रस्त्यामुळे अग्निशामक दलाची वाहने घटनास्थळापर्यंत पोहोचू शकली नाहीत. अखेर अग्निशामकच्या जवानांना घटणास्थळी दुचाकीवरून जावे लागले. ही वाहने तब्बल 700 मीटर अलीकडेच थांबवावी लागली. तसेच या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचविण्यासाठी रुग्णवाहिका वेळेत दाखल झाल्या. मात्र, त्याही घटनास्थळी जाऊ शकल्या नाहीत. या दुर्घटनेला सत्ताधारी जबाबदार असल्याची टीका माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केली आहे. राजेंद्र जगताप यांनी सांगितले, की या गल्लीतील नागरिकांची नावे मतदार यादीत नसल्याने सत्ताधाऱ्यांनी येथे सोयीसुविधा दिलेल्या नाहीत. तसेच संपूर्ण चाळच अनधिकृत आहे. मालक फक्त घरभाडे घ्यायला येतात. मात्र, प्रत्यक्षात रहिवासाच्या नावाखाली काय काय धंदे केले जातात, याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते. येथे बेकायदेशीरपणे गॅस सिलेंडर भरून दिले जातात, याकडेही चाळ मालकाने दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसते. केवळ पैसे मिळतात, म्हणून कुणालाही भाड्याने घरे दिली जात असल्याचा प्रकार धक्कादायक आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading