कलाक्षेत्रातील गुरुकुल परंपरा जतन करणे आवश्यक : डॉ. विजय भटकर
पुणे : भारतात आजही लहान-मोठ्या प्रमाणात गुरुकुल पद्धतीने संस्कृती व परंपरा जपली जात आहे. ही परंपरा जीवंत ठेवण्यासाठी आधुनिक युगातील नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अनेक आविष्कार घडावेत व ही परंपरा प्रवाही ठेवण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केली. ‘जर्नी इन ड्रीम’ या पुस्तकाद्वारे उस्ताद उस्मान खान यांच्याशी प्रत्यक्ष हितगुज करीत आहोत अशी भावना हे पुस्तक वाचताना होते, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
अनुबंध प्रकाशन प्रकाशित ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खान यांचे आत्मचरित्र असलेल्या ‘जर्नी इन ड्रीम’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. भटकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी होत्या. अनिल कुलकर्णी, स्वाती प्रभुमिराशी, क्षितिज पाटुकले, नूरजहाँ खान पुस्तकप्रकाशन प्रसंगी उपस्थित होते.
भारतात ज्याप्रमाणे वेदांच्या परंपरा जपल्या जात आहेत त्या प्रमाणेच कलाक्षेत्रात ज्ञानदान करणारी गुरुकुल परंपराही जतन करणे आवश्यक आहे, असे सांगून डॉ. भटकर म्हणाले, याकरिता भारतातील अनेक ठिकाणी गुरुकुल पद्धतीने ज्ञानदान करणाऱ्या संस्था एकत्रित करून भारत विश्वज्ञानपीठ स्थापन करावे अशी आपली इच्छा आहे.
डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, प्रत्येक कलाकाराचे रसिकाशी अनोखे अनुबंध असतात. कलाकारापेक्षाही रसिक भाग्यवान असतो कारण तो कलेचा रसास्वाद घेऊ शकतो. प्रत्येक गोष्टीचे उन्नयन करायला कला आपल्याला प्रेरित करीत असते. तसेच अंतर्मुख होऊन विचार करण्याची प्रक्रियाही संगीत कला शिकविते.
मनोगत व्यक्त करताना उस्ताद उस्मान खान म्हणाले, माझा जगण्याचा प्रवास स्वप्नवत आहे. शास्त्रीय संगीतात जगणे इतके सोपे नाही. या स्वप्नातील प्रवासाकडे पाहताना मी कुठे होतो आणि कुठवर आलो हे माझ्याचदृष्टीने अनाकलनीय आहे. विश्वात आपल्या देशाविषयी मत मांडताना संगीताचे ज्ञान अत्यावश्यक आहे, असे वाटल्याने मी लहान मुलांना संगीताचे प्राथमिक शिक्षण देत आहे, याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला.
सूत्रसंचालन माधुरी कुलकर्णी यांनी केले तर आभार अस्मिता कुलकर्णी यांनी मानले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात तीन पिढ्यातील सतारवादनाचा प्रवास दर्शविणारा स्वरविराजस हा कार्यक्रम सादर करण्यात आला. उस्ताद उस्मान खान, रुकिया खान-देशमुख, माध्यमी देशमुख यांचे बहारदार सतारवादन झाले. त्यांना डॉ. अतुल कांबळे यांनी समर्पक तबलासाथ केली.
