OBC reservation : ओबीसी संवर्गातील ‘या’ जागांवरील निवडणुकांना स्थगिती
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या 27 टक्के राजकीय आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे येत्या 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांतील ओबीसी संवर्गातील जागांवरील निवडणुकांना राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे राज्यभरातील तब्बल 413 ओबीसी संवर्गातील जागांवरील निवडणुका स्थगित झाल्या आहेत.
ओबीसी संवर्गातील जागा खालील प्रमाणे –
- भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद- 23 (एकूण जागा 105)
- भंडारा व गोंदियातील 15 पंचायत समित्या- 45 (एकूण जागा 210)
- राज्यातील 106 नगरपंचायती- 344 (एकूण जागा 1,802)
- महानगरपालिका पोटनिवडणुका- 1 (एकूण 4 जागा)
राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज ही माहिती दिली. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे. त्याचबरोबर चार महानगरपालिकांतील 4 रिक्तपदांच्या आणि 4 हजार 554 ग्रामपंचायतींतील 7 हजार 130 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे.
मात्र, काल (6 डिसेंबर) सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आता या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी संवर्गातील जागांवरील निवडणुका आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात आल्या आहेत; परंतु अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण जागांसाठीची निवडणूक पूर्व घोषित कार्यक्रमानुसार पुढे सुरू राहील. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग जागांच्या स्थगित निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असेही मदान यांनी सांगितले.
