Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

मराठयांनी काशीतील घाटांचे केले पक्के बांधकाम – डॉ.गिरीश मांडके

पुणे : अटक ते कटक पर्यंत मराठयांनी मजल मारली होती. याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. तसेच काशीतील वास्तुवैभवाविषयी कागदपत्रे प्रसिद्ध झाली आहेत. परंतु ती ऐतिहासिक कागदपत्रे आज फारशी उपलब्ध नाहीत. पहिल्या बाजीरावांच्या काळातील काही कागदपत्रांच्या आधारे आपण तेथील परिस्थितीचा अभ्यास करु शकतो. काशीला तब्बल २ हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. तेथे नदीकाठी मोठया प्रमाणात घाट बांधण्यात आले होते. परंतु ते मातीचे घाट होते. मराठयांनी ख-या अर्थाने या घाटांची पुर्नबांधणी करुन पक्के बांधकाम केले आहे, असे डेक्कन कॉलेजचे डॉ.गिरीश मांडके यांनी सांगितले.

इतिहास संस्कृती कट्टा आणि डॉ. चंद्रशेखर गणेश पेशवे यांनी आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत मराठे पुरस्कृत काशीतील वास्तुवैभव या विषयावर डॉ.मांडके यांचे व्याख्यान सदाशिव पेठेतील इतिहास संशोधन मंडळाच्या सभागृहात झाले. यावेळी सेनापती दाभाडे यांचे वंशज सत्यशीलराजे दाभाडे, पेशव्यांचे वंशज पुष्कर पेशवा, देवदेवेश्वर संस्थानचे विश्वस्त रमेश भागवत, जगन्नाथ लडकत, डॉ. सचिन जोशी, महेश फणसळकर, सचिन दाते, विशाल खुळे, अरुण बाभूळगावकर आदी उपस्थित होते. व्याख्यानमालेतील हे पाचवे पुष्प होते.

डॉ.गिरीश मांडके म्हणाले, काशीमध्ये विविध प्रकारचे सुमारे ८४ घाट आहेत. तसेच विविध प्रकारची मंदिरे देखील आहेत. याठिकाणी संस्कृतमध्ये शिलालेख उपलब्ध आहेत. त्यावरुन तेथील इतिहासाविषयीचा अभ्यास करता येतो. मराठी लोकांची वस्ती या घाटांच्या परिसरात पहायला मिळते. मराठी लोकांचे ४ ते ५ मजली ऐतिहासिक वाडे देखील येथे पहायला मिळतात.

ते पुढे म्हणाले, आज देखील याठिकाणी वाडयांमध्ये राहणा-या महिला एकत्र जमतात. श्लोकपठणासारखे अनेक कार्यक्रम एकत्रितपणे येथे केले जातात. आंग्रे, पटवर्धन, भावे, पाटणकर अशा अनेक मराठी व्यक्तींचे वाडे येथे आहेत. त्यामुळे पेशव्यांच्या काळापासून आजपर्यंत येथील विकासात मराठी लोकांचा मोठा सहभाग असल्याचे दिसून येते. पेशव्यांच्या विषयी असलेल्या कागदपत्रांमध्ये याचे पुरावे आढळतात, असेही त्यांनी सांगितले. शिवराम कार्लेकर यांनी प्रास्ताविक केले. विद्याचरण पुरंदरे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading