Sunday, November 1, 2026
Latest NewsPUNE

शनिवारवाडा येथे जलकलश, मूर्ती व तलवार पूजनाने श्रीमंत नानासाहेब पेशवे जन्म त्रिशताब्दी सोहळ्याला प्रारंभ

पुणे : श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या जन्म त्रिशताब्दी सोहळ्यानिमित्ताने त्यांच्या मूर्तीसह रायगड, वढू, रावेरखेडी, थेऊर व वानवडी या महापुरुषांच्या समाधीस्थानावरील पवित्र जल आणलेल्या जलकलशाचे पूजन शनिवारवाडा येथे करण्यात आले. श्रीमंत नानासाहेबांनी सन १७५२ साली सरदार अंताजी माणकेश्वर गंधे यांना भेट दिलेल्या तलवारीचे पूजन करुन पेशव्यांच्या जन्म त्रिशताब्दी सोहळ्याला विविध सरदारांच्या वंशजांच्या उपस्थितीत उत्साहात प्रारंभ झाला.

श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे स्मारक समितीतर्फे श्रीमंत नानासाहेब पेशवे जन्म त्रिशताब्दी  मुख्य सोहळ्याचे आयोजन नानासाहेबांचे जन्मगाव असलेल्या वडगाव मावळ येथील साते येथे करण्यात आले आहे. या सोहळ्याची सुरुवात शनिवारवाडा येथील कार्यक्रमाने झाली. यावेळी विविध सरदारांच्या वंशजांपैकी पुष्कर पेशवे, विक्रमसिंह मोहिते, योगेश्वर गंधे, सत्यशीलराजे दाभाडे, मयुरेश चासकर, शाहीर हेमंतराजे मावळे, समितीचे अध्यक्ष मोहन शेटे आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन देखील मान्यवरांच्या हस्ते झाले.

मोहन शेटे म्हणाले, श्रीमंत बाजीराव पेशवे आणि काशीबाई यांचे सुपुत्र श्रीमंत नानासाहेब यांचा जन्म ६ डिसेंबर १७२१ रोजी वडगाव मावळ येथील साते गावी झाला. श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे हे मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते. इसवी सन १७४० ते १७६१ असे २१ वर्ष त्यांनी हिंदवी साम्राज्याचे पंतप्रधान म्हणून कार्य केले. यंदाचे त्यांचे त्रिजन्मशताब्दी वर्ष असून त्यानिमित्त त्यांच्या जन्मगावी मुख्य सोहळ्यांतर्गत नानासाहेब पेशवे गौरव ग्रंथाचे प्रकाशन होणार असून ३०० युवक समूह गायनाने आदरांजली अर्पण करणार आहेत. हा कार्यक्रम रविवार, दि. ५ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी ४ वाजता जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावरील वडगाव मावळ जवळ साते या गावात होणार आहे.

योगेश्वर गंधे म्हणाले, सन १७५२ मध्ये मराठे आणि मोगल यांच्यात अहमदिया करार झाला. दिल्लीच्या बादशाहाचे संरक्षण करण्याकरीता मराठी  फौजा पाठविण्यात आल्या. त्या फौजेचे सेनापती सरदार अंताजी माणकेश्वर गंधे हे होते. त्यावेळी त्यांना नानासाहेब पेशव्यांनी धोप प्रकारातील ही तलवार भेट दिली. शनिवारवाडयामध्ये ही तलवार त्याकाळी सरदार गंधे यांनी भेट म्हणून मिळाली होती. त्याचे पूजन आज करण्यात आले. आमची नववी पिढी या तलवारीचे जतन करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply