मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी महापालिका पुन्हा एकदा अभय योजना राबविणार
पुणे:महापालिकेच्या मिळकतकर थकबाकीची रक्कम 7 हजार कोटींच्या जवळपास आहे. त्यात मोबाईल टॉवरची सोळाशे कोटी व उर्वरित थकबाकी इतर मिळकतींची आहे. थकबाकीवर लागत असलेल्या शास्तीमुळे हा आकडा फुगत चालला आहे. त्यामुळे प्रशासनाने गत आर्थिक वर्षात 50 लाख रुपयांपर्यंतच्या थकबाकीदारांसाठी अभय योजना राबविली होती. त्यात 485 कोटींची थकबाकी वसूल झाली होती.
मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने पुन्हा एकदा अभय योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. एक कोटी रुपयांपर्यंतच्या थकबाकीदारांसाठी ही योजना असणार असून, यासंबंधीचा प्रस्ताव आज स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.
या योजनेला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी चालू आर्थिक वर्षात पुन्हा अभय योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यासंबंधीचा प्रस्ताव मिळकतकर विभागाने घेतला आहे. त्यानुसार 1 कोटी रुपयांपर्यंतच्या थकबाकीदारांना थकीत मिळकतकराच्या दंडावर 75 टक्के इतकी सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे गत योजनेचा लाभ मिळू न शकलेल्या थकबाकीदारांनाही आता या योजनेचा फायदा घेता येणार आहे.
