मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा ९ ऑक्टोबरपासून
मुंबई : सिंधुदुर्गातील चिपी येथे सुमारे ८०० कोटी रुपये खर्चून बांधलेल्या विमानतळाचे काम पूर्ण झाले असून या विमानतळाचे उद्घाटन ९ ऑक्टोबरला होणार आहे. याच दिवसापासून मुंबई-सिंधुदुर्ग अशी विमानसेवा सुरू होणार आहे. मुंबई-सिंधुदुर्ग विमान प्रवास २५२० रुपयांत करता येणार आहे. दीड तासांत मुंबईतून सिंधुदुर्गात पोहोचता येणार आहे.
एअरलाईन्स कंपनी अलायन्स एअर ९ ऑक्टोबरपासून मुंबई ते सिंधुदुर्ग उड्डाण सुरू करणार आहे. अलायन्स एअर ही एअर इंडियाची प्रादेशिक उड्डाण उपकंपनी आहे. एअर इंडिया लवकरच एका खासगी कंपनीच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्याची तयारी सुरू आहे. अलायन्स एअरने सांगितले की, ते ९ ऑक्टोबरपासून मुंबई ते सिंधुदुर्ग उड्डाणे सुरू करणार आहे. अलायन्स एअर या मार्गावर दररोज थेट हवाई सेवा सुरू करेल. मुंबई सिंधुदुर्ग प्रवासासाठी २ हजार ५२० रुपये, तर सिंधुदुर्ग ते मुंबई फेरीसाठी २ हजार ६२१ रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. अलायन्स एअर आपले ७० आसनी एटीआर ७२-६०० हे विमान मुंबई-सिंधुदुर्ग दरम्यानच्या उड्डाणासाठी रुजू ठेवणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. देशातील हवाई उड्डाणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशांतर्गत हवाई प्रवास सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारने प्रादेशिक जोडणी योजना सुरू केली आहे. याअंतर्गत देशाच्या छोट्या विमानतळांवरून देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यात येत आहे.
