कोरोनामुळे मृत्यु झालेल्या व्यक्तीच्या कुटूंबाला मिळणार 50 हजार रुपये
NDMA कडून नुकसान भरपाईची रक्कम निश्चित
नवी दिल्ली : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या प्रत्येक व्यक्ती मागे त्याच्या कुटूंबाला 50,000 रुपयांची भरपाई मिळणार आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) सर्वोच्च न्यायालयाला याबाबत माहिती दिली आहे. राज्यांच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून ही भरपाई दिली जाणार आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने 30 जून रोजी दिलेल्या एका आदेशात, देशात कोरोनामुळे झालेल्या प्रत्येक मृत्यूची भरपाई देण्यास सांगितले होते. मात्र किमान नुकसानभरपाईची किंमत ठरविण्याची जबाबजारी न्यायालयाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला सोपवली होती. त्यानुसार आज राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सर्वोच्च न्यायालयात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या प्रत्येक व्यक्ती मागे त्याच्या कुटूंबाला 50,000 रुपयांची भरपाई दिली जाईल असे स्पष्ट केले आहे.
या प्रकरणात संबंधीत याचिकाकर्त्यांनी म्हटले होते की, करोंनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींना थेट रुग्णालयातून अंतिम संस्कारांसाठी नेले जात होते. ना त्याचे शवविच्छेदन झाले आहे, ना मृत्यूच्या प्रमाणपत्रात असे लिहिले आहे की मृत्यूचे कारण कोरोना आहे. अशा स्थितीत भरपाई योजना सुरू झाली तरी लोक त्याचा लाभ घेऊ शकणार नाहीत. यावर न्यायालयाने म्हटले होते की, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या मृत्यूच्या प्रमाणपत्रांमध्ये मृत्यूचे कारण स्पष्टपणे लिहिले पाहिजे. प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुलभ केली पाहिजे. जर दिलेल्या प्रमाणपत्राविरोधात कुटुंबाची काही तक्रार असेल तर ती सोडवली पाहिजे.
