मेहुणपुरा मंडळातर्फे दरोडेखोरांशी लढणा-या आवेझ अन्सारी यांचा सन्मान
पुणे : आजच्या तरुणाईसमोर चांगला आदर्श असावा आणि पराक्रमाची पूजा करणा-या तरुणाचा सन्मान व्हावा, याउद््देशाने शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व अभेद्य वाद्य पथकातर्फे सन्मान सोहळ्याचे आयोजन मंडळासमोर करण्यात आले. पुण्यामध्ये दरोडेखोरांशी दोन हात करीत पराक्रम गाजविणा-या आवेझ अन्सारी या युवकाचा सन्मान यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाला भारतीय सेनेतील हवालदार मेजर संजय नाळे (निवृत्त), सुभेदार मेजर बाबू जाधव (निवृत्त), सुभेदार मेजर परशुराम शिंदे (निवृत्त), सैनिक मित्र परिवारचे आनंद सराफ, ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, मंडळाचे अध्यक्ष सचिन शिंदे, उपाध्यक्ष अनंत कावणकर, अभेद्य ढोल-ताशा पथकाचे अध्यक्ष कौस्तुभ कुदळे आदी उपस्थित होते. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे सन्मानाचे स्वरुप होते.
दरोडेखोरांना समोर पाहून न डगमगता आवेझ अन्सारी या युवकाने त्यांच्याशी दोन हात केले. स्वत: निशस्त्र असूनही सशस्त्र दरोडेखोरांसोबत लढा दिला. त्याबद्दल मंडळाने आणि पथकाने त्यांचा सन्मान केला आहे. आजच्या युवा पिढीसमोर अशा युवकांचा आदर्श असणे गरजेचे आहे. त्यामुळे लष्करातील अधिकारी व धाडसी युवक यांना एकत्र करुन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे मंडळातर्फे सांगण्यात आले.
