अरुणाचल प्रदेशमधील जवानांकडून नू.म.वि. मुलींच्या प्रशालेतील- विद्यार्थीनींना मिठाई सिमेवर पाठविलेल्या राख्यांना जवानांचे उत्तर
पुणे : स.प.महाविद्यालयाजवळील नू. म. वि. मुलींची प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी लेह, लडाख, सियाचीन, अरुणाचल प्रदेश या सीमांवरील सैनिकांना राख्या पाठविल्या होत्या. छोटया बहिणींना पाठविलेल्या या राख्या जवानांनी आत्मियतेने बांधल्या आणि अरुणाचल प्रदेश येथे कार्यरत असलेले ५६ इन्फ ट्री सिग्नल रेजिमेंटचे कमान अधिकारी कर्नल सौरभ सोतियाजी यांनी साता-यातील जवान महादेव कांबळे यांना प्रशालेत पाठवून राख्यांना उत्तर म्हणून मिठाई व फोटो पाठविले आहेत. ते पाहून प्रशालेतील विद्यार्थीनी, शिक्षीका यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
प्रशालेतील इयत्ता ५ वी ते १२ वी मधील विद्यार्थीनींनी डाळी, कडधान्ये, झाडांच्या बिया, टाकाऊ वस्तू, पेपर क्विलिंगचा वापर करुन अत्यंत सुबक व कलात्मक २०० राख्या तयार केल्या होत्या. विद्यार्थिनींनी या राख्यांबरोबरच जवानांप्रति आदरयुक्त, हृदयस्पर्शी संदेश लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. या उपक्रमाकरीता नू. म. वि. मुलींची प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे शाला समिती अध्यक्ष कालकर सर, मुख्याध्यापिका गीता साने, उपमुख्याध्यापिका संगिता कांबळे, पर्यवेक्षिका सुनिता ताडला आदींनी मार्गदर्शन केले.
गीता साने म्हणाल्या, सिमेवरील जवानांनी आवर्जून छोट्या बहिणींना मिठाई आणि सोबत राखी बांधून घेतलेले फोटो आणि फोटो फ्रेम, एक भावपूर्ण पत्र पाठवले. तसेच शुभम त्रिपाठीजी यांनी ७वी मधील राधिकासाठी इ-मेलद्वारे शुभेच्छा पाठविल्या आहेत. आम्ही नू. म. वि. च्या सर्व शिक्षिका आमच्या शाळेकडून कर्नल सौरभ सोतियाजी, शुभम त्रिपाठीजी आणि त्याच्या सहका-यांचे आभार मानत असल्याचे त्यांनी सांगितले.
