अमेझॉन मराठी आणि बंगाली भाषांच्या समावेशाने करत आहे प्रादेशिक भाषेतील ऑफरिंगचा विस्तार
बेंगळुरू: सणासुदीचा काळ जवळ आलेला असतानाच, Amazon.in वरून ग्राहक मराठी व बंगाली भाषांचाही वापर करून खरेदी करू शकतात अशी घोषणा अमेझॉन इंडियाने आज केली. हिंदी, इंग्रजी, कन्नडा, मल्याळम, तमीळ व तेलुगू या पाच भाषा वापरून खरेदी करण्याची सुविधा आधीपासूनच आहे. Amazon.in हिंदी भाषेत व्हॉइस शॉपिंग सुरू करून प्रादेशिक भाषांतील ऑफरिंग अधिक विस्तारणार आहे. या नवीन उपक्रमांमुळे भाषेचा अडथळा दूर होत आहे आणि ईकॉमर्स भारतभरातील लक्षावधी ग्राहकांसाठी अधिक उपलब्ध होण्याजोगे तसेच सोयीस्कर होत आहे.
Amazon.in मराठी व बंगाली भाषेत सुरू करण्याच्या प्रक्रियेदरम्यान, अमेझॉनने प्रत्येक भाषेमध्ये अचूक व समजण्याजोगा यूजर अनुभव विकसित करण्यासाठी कुशल भाषातज्ज्ञांसोबत काम केले आहे. अचूक भाषांतर करण्याऐवजी टीमने अधिक वापरात असलेल्या संज्ञांचा वापर केला आहे, जेणेकरून खरेदीचा अनुभव अस्सल, समजण्यास सोपा आणि ग्राहकांसाठी सुखद व्हावा. अमेझॉन ग्राहक अँड्रॉइड किंवा आयओएस अॅप्स, मोबाइल तसेच डेस्कटॉप साइट्सवरून काही सुलभ पायऱ्यांद्वारे त्यांच्या पसंतीची भाषा निवडू शकतात. ग्राहकाने एकदा भाषा निवडली की, भाषा प्राधान्याची (लँग्वेज प्रेफरन्स) नोंद केली जाते आणि ग्राहकाच्या पुढील भेटींच्या वेळी हे स्मरणात ठेवले जाते. ग्राहक आता सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा खरेदी अनुभव त्यांनी निवडलेल्या भाषांमध्ये घेऊ शकतील, सणासुदीचा काळ जवळ आलेला असल्याने त्यांना उत्तम डील्स व सवलतींची माहिती दिली जाईल, ते ऑर्डर्स प्लेस करून पैसे चुकते करू शकतील, उत्पादनाबद्दलती तपशीलवार माहिती वाचू शकतील, त्यांच्या खात्याची माहिती व्यवस्थापित करू शकतील, ऑर्डर ट्रॅक करू शकतील आणि ऑर्डर हिस्टरीही बघू शकतील.
२०२० वर्षात इंग्रजीमध्ये व्हॉइस शॉपिंग सुरू केल्यानंतर आता लवकरच हा अनुभव हिंदी भाषेतही आणला जाणार आहे. हिंदी भाषेत व्हॉइस शॉपिंग सुरू झाल्यानंतर ग्राहक आपल्या आवाजाचा वापर करून उत्पादनांचा शोध घेऊ शकतील किंवा ऑर्डरच्या स्टेटसबद्दल जाणून घेऊ शकतील. उदाहरणार्थ, ग्राहक माइक आयकॉनवर टॅप करतील आणि पादत्राणांचा शोध घेण्यासाठी म्हणतील “जुते दिखाओ” किंवा ऑर्डर ट्रॅक करण्यासाठी ते “मेरा सामान कहाँ है” असे विचारू शकतील. हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग अनुभव उपलब्ध करून घेण्यासाठी ग्राहकांना त्यांचे अमेझॉन अॅप प्ले स्टोअरमध्ये जाऊन अपडेट करून घेणे आवश्यक ठरेल. अॅप अपडेट करून घेतल्यानंतर ग्राहक ते अॅप उघडून त्यांच्या पसंतीची अॅप भाषा म्हणून हिंदी निवडू शकतात आणि सर्च बारच्या बाजूला दाखवलेल्या मिक आयकॉनवर क्लिक करू शकतात. व्हॉइस ऑफरिंग केवळ अँड्रॉइड उपकरणांसाठीच उपलब्ध आहे. या लाँचमुळे ग्राहक हिंदी किंवा इंग्रजी भाषेत आपल्या आवाजाचा वापर करून अँड्रॉइड अॅपवरील Amazon.inच्या अनेकविध टचपॉइंट्सवर जाऊ शकतात, उत्पादने शोधू शकतात व अन्य अनेक सुविधांसह वस्तू कार्टमध्ये टाकू शकतात.
