हिंदू-मुस्लिम बांधवांनी कोविड काळात माणुसकी जिवंत ठेवली – महापौर मुरलीधर मोहोळ
अखिल मंडई मंडळ, उम्मत सामाजिक संस्था आणि बंधुभाव भाईचारा फाउंडेशन यांच्यावतीने बंधुभाव गणेशोत्सव पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यावेळी शिक्षणतज्ञ पी.ए. इनामदार, नजीर तांबोळी, नूर सय्यद, झकीर मेमन, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, संजय मते, नगरसेवक सम्राट थोरात, माजी महापौर दत्ता धनकवडे यावेळी उपस्थित होते. यावेळी मोदक-शिरखुर्मा हा प्रसाद बाप्पाला दाखवून भाविकांना शिरखुर्म्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे संयोजन उम्मत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जावेद खान आणि शब्बीर शेख यांनी केले.
हिंदू मुस्लीम एकता जोपासत वर्षांनुवर्षे गणरायाची सेवा करणार्या गणेशभक्त कार्यकर्त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. गजानन पंडित, मदिना तांबोळी, इक्बाल दरबार, निलेश नवलखा, निलेश राऊत, डॉ. मुश्ताक मुकादम, महंमदभाई बागवान, अब्दुल वहाब शेख, अब्दुल करीम अत्तार, असगरभाई गोध्रावाला, अयाज खान यांना पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे पुरस्कारचे स्वरुप होते.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, हिंदू मुस्लिम ऐक्य जपणार्या पुण्याचे मी प्रतिनिधीत्व करतो, याचा मला अभिमान आहे. ऐतिहासिक आणि सामाजिक कार्याचा वारसा जोपासणाऱ्या पुणे शहरात बंधुभावाची परंपरा देखील जतन करण्यात आली आहे.
पी.ए. इनामदार म्हणाले, ईश्वर एकच आहे, हे सगळ्या धर्माने मान्य केले आहे. पुण्याच्या गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये जो उत्साह आणि श्रद्धेचे वातावरण असते, हे वातावरण वर्षभराची ऊर्जा देते. या कार्यक्रमातून हिंदू-मुस्लीम ऐक्य पहायला मिळते. या पुण्यात रुजलेल्या या हिंदू मुस्लीम एकतेचा विचार भारतभर पोहोचविण्याचा प्रयत्न करु, असेही त्यांनी सांगितले. इक्बाल अन्सारी, अमोल देवळेकर यांनी सूत्रसंचालन केले. युवराज शहा यांनी आभार मानले.
