Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

मराठवाड्याचा 80 हजार कोटीचा अनुशेष भरून काढण्यासाठी तीव्र लढा उभारण्याची गरज – माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचे प्रतिपादन

पिंपरी : 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल एक वर्ष एक महिना एक दिवसाने मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्त झाला. त्यावेळी तत्कालिन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी लोकसंख्येच्या प्रमाणात मराठवाड्याच्या विकासासाठी निधी देऊ; या भागातील तरूणांना शासकीय नोकर्‍यामध्ये प्राधान्य देवू, असे आश्‍वासन दिले होते. परंतु, त्या प्रमाणात मराठवाड्याचा विकास झालेला नाही. हा बॅकलॉक भरून काढण्यासाठी मराठवाडा विकास मंडळाची स्थापना करून तीव्र लढा उभारणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
जेएसपीएम शिक्षण संस्था संचलित अराईज इंटरनॅशनल स्कूल भोसरी व मराठवाडा मित्रमंडळ परिवार, पिंपरी-चिंचवड यांच्या संयुक्‍त विद्यमाने 74 व्या मराठवाडा मुक्‍तीदिन महोत्सव व पुरस्कार वितरण सोहळा 2021 व ध्वजारोहन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेएसपीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर हे होते; तर प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश व अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस हे प्रमुख व्याख्याते होते. तसेच मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज डेक्‍कन, पुणेचे कार्याध्यक्ष डॉ. भाऊसाहेब जाधव, पिंपरी-चिंचवड मनपाचे माजी गटनेते एकनाथ पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवाजीराव पाटील कव्हेकर म्हणाले, की 1983 मध्ये 840 कोटीचा बॅकलॉक होता. 1994 मध्ये 4 हजार कोटीवर गेला आणि आज हा बॅकलॉक 80 हजार कोटीवर गेलेला आहे. परंतु मराठवाड्याच्या नेतृत्वाने तो बॅकलॉक भरून काढण्यासाठी कुठलाही प्रयत्न केलेला नाही. परिणामी मराठवाडा हा दुष्काळवाडा झालेला आहे. त्यामुळे आता तरी मराठवाड्याचा 80 हजार कोटीचा अनुशेष भरून काढण्याची गरज आहे. हा अनुशेष भरून काढण्यासाठी मराठवाडा विकास मंडळाची स्थापना करून तीव्र लढा उभारणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, मराठवाडा हा खऱ्या अर्थाने तेव्हा मुक्त होईल, जेव्हा असाक्षरता, गरिबी, सामाजिक, पाण्याचा विकासाच्या समस्यापासून मुक्ती मिळेल. त्यासाठी सर्व मराठवाड्यातील शिक्षित वर्गाने संघटीत होऊन मराठवाड्यातील सर्वांगीण विकास प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले की, निजामशाहीची जुलमी राजवट सरदार वल्लभभाई पटेल, स्वामी रामानंदतीर्थ, गोविंदभाई श्रॉफ व अनेक स्वातंत्र सेनानी यांच्या अथक परिश्रमाने व बलिदानाने मोडून काढली. ह्या स्वातंत्र्याचा आपण आदर केला पाहिजे.
उल्लेखनीय समाजोपयोगी कार्यासाठी अराईज इंटरनॅशनल स्कुल, भोसरी व मराठवाडा मित्र परिवारातर्फे मराठवाडा भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. यामध्ये अरूण पवार यांना वृक्षमित्र पुरस्कार, श्रीराम हांडीबाग यांना उद्योजक पुरस्कार, संजू राम माने यांना कोरोना योद्धा पुरस्कार, प्रा. डॉ. गजानन वाव्हळ यांना समाज प्रबोधनकार, सुनिल जाधव यांना सामाजिक पुरस्कार, दत्तात्रय इंगळे यांना समाजसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
 प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमचे पूजन करून ध्वजारोहन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश इंगोले यांनी, सूत्रसंचालन चौगुले यांनी, तर आभार प्राचार्य खैरनार यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading