Saturday, October 31, 2026
Latest NewsPUNE

अजिंठा लेण्यांतील चित्रे तत्कालीन कलाकारांच्या तंत्रकौशल्य व कलादृष्टीचा प्रत्यय देणारी



पुणे  : अजिंठा लेण्यांतील चित्रांमधून तत्कालीन वस्त्रप्रावरणांचे घडणारे दर्शन, हे वस्त्रसंस्कृतीचा उत्तम नमुना तर आहेच, पण ही वस्त्रप्रावरणे तत्कालीन कलाकारांचे उच्च दर्जाचे तंत्रकौशल्य आणि कलात्मक दृष्टीचा व निरीक्षणशक्तीचा प्रत्ययही देतात, असे उद्गार बहुभाषिक लेखिका, वृत्तपत्र स्तंभलेखिका व भारतीय हातमागावरील वस्त्रपरंपरा आणि मंदिर वास्तुकलेच्या, अभ्यासक व तज्ज्ञ शेफाली वैद्य यांनी शनिवारी येथे काढले.

पुण्यातील इंडी हेरीटेज व परिमल अँड प्रमोद चौधरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘डायलॉग’ या उपक्रमांतर्गत ‘प्राचीन भारतीय वस्त्रकला – अजिंठा विशेष’ या विषयावर शेफाली वैद्य यांचे सादरीकरण झाले. इंडी हेरीटेजचे संस्थापक संचालक तुषार जोशी यावेळी उपस्थित होते.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर येथील फिरोदिया सभागृहात संपन्न झालेल्या या सादरीकरणासाठी श्रोत्यांना विनामूल्य प्रवेश होता. शेफाली वैद्य यांना भारतीय वस्त्रप्रावरणे आणि मंदिरांमधील प्रतिमानांचे तुलनात्मक अध्ययन करण्यासाठी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेकडून बोरी – इन्फोसिस फेलोशिप मिळाली असून, त्याविषयीचे अभ्यासपूर्ण निष्कर्ष त्यांनी सादर केले.

वैद्य यांनी रंगीत पारदर्शिकांच्या माध्यमातून सादरीकरण करताना, अजिंठा येथील चित्रांमधून दिसणार्या वस्त्रप्रतिमा आणि त्यातून उलगडणारा सांस्कृतिक वस्त्रवारसा, यांचे विवेचन केले. इसवीसनपूर्ण दुसरे शतक ते इसवीसनाचे सहावे शतक, अशा दीर्घ काळात अजिंठा लेण्यांमधील चित्रांचे अंकन झाले. सातवाहन ते वाकाटक, अशा राजवटींचा काळ, दक्षिणापथ आणि उत्तरापथ, या व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे स्थान, राजवंश, श्रेष्ठीगण, विदेशी लोकांचे जाणे-येणे आणि राजकीय स्थैर्य मिळाल्याने कलाप्रकारांना मिळालेला आश्रय यांच्या एकत्रित परिणामातून ही चित्रे साकारली आहेत, असे सांगून वैद्य म्हणाल्या, काळा, पांढरा, लाल, पिवळा, हिरवा आणि निळा, हे प्रमुख रंग या चित्रांतून दिसतात. सर्व रंग नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण केले होते आणि त्यांचे सौंदर्य आजही टिकून आहे. लेण्यांमधील पद्मपाणि बोधिसत्त्वाच्या प्रतिमेमुळे तत्कालीन वस्त्रपरंपरेविषयीचे कुतूहल जागृत झाले, असे त्या म्हणाल्या.

अजिंठाकालीन वस्त्रप्रावरणांचे नेसलेले आणि शिवलेले, हे प्रमुख प्रकार होते. उत्तरीय (शरीराच्या वरच्या भागासाठीचे वस्त्र), अधरीय (शरीराच्या खालच्या भागासाठीचे वस्त्र), कायाबंध – कटिवस्त्र किंवा कमरबंध आणि उपरणे तसेच सोगा प्रकारचे वस्त्र, कंचुक प्रामुख्याने दिसतात. वस्त्रे अतिशय तलम, पारदर्शक आणि झुळझुळीत प्रकारची दिसतात. त्यावरील डिझाईन्समध्ये त्या काळातील लोकप्रिय पॅटर्न्स अंकित केलेले दिसतात. चौकटी, भौमितिक आकार, फुले, पाने, वेली, पक्षी, प्राण्यांचे अंकनही वस्त्रांवर दिसते. आजही ते पॅटर्न्स आधुनिक इक्कत, पटोला, पैठणी या वस्त्रांवर दिसून येते. वस्त्रांचे काठही विविध प्रकाराने सजवलेले दिसतात. वस्त्रे वार्‍याने उडत आहेत, बसल्याने दुमडली आहेत, चुण्या, वळ्या पडल्या आहेत..यांचेही सुस्पष्ट अंकन चित्रांतून दिसते. राजवस्त्रे अतिशय तलम प्रकारची असून, त्यात हंसदुकूल हा पॅटर्न वारंवार दिसतो, असे निरीक्षण वैद्य यांनी नोंदवले. स्त्रीपुरुषांच्या तसेच विदेशींच्या व बालकांच्या वस्त्रांतील फरक चित्रकारांच्या सूक्ष्म निरीक्षणाचा व सौंदर्यदृष्टीचा प्रत्यय देतो. आसनांचे सुशोभन, पडदे, अभ्रे…हा वस्त्रसंभारही वैशिष्ट्यपूर्ण दिसतो, असे त्या म्हणाल्या.

इंडी हेरीटेजचे तुषार जोशी यांनी स्वागतपर प्रास्ताविकात श्रोते आणि विषयतज्ज्ञ, यांच्यातील थेट संवाद डिजिटल युगात हरवत चालला आहे. तो पुन्हा प्रस्थापित व्हावा, या हेतूने डाॅयलाॅग उपक्रम सुरू केल्याची माहिती दिली. ईशा राठोड यांनी सूत्रसंचालन व परिचय करून दिला.

Leave a Reply