जगभरातील ७०,६०५ गणेशभक्तांनी केली ‘दगडूशेठ’ च्या श्रीं ची आरती

पुणे : केवळ पुण्यातील नव्हे तर जगभरातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती यंदाच्या गणेशोत्सवात जगभरातील तब्बल ७० हजार ६०५ गणेशभक्तांनी स्वत:च्या घरातून केली. उत्सवाच्या सहाव्या दिवसापर्यंत सुमारे ६० देशांतील भाविकांनी आॅगमेंटेंड रिअ‍ॅलिटी या ट्रस्टने पुढाकार घेऊन दिलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करीत आरती केली. तर, २० हजारहून अधिक भाविकांनी अनेकदा या तंत्राचा वापर केल्याचे दिसून आले आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२९ व्या वर्षीच्या गणेशोत्सवात आॅगमेंटेंड रिअ‍ॅलिटी या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. केंद्र व राज्य शासनाने केलेल्या आवाहनानुसार जास्तीत जास्त भक्तांनी आॅनलाईन दर्शन घ्यावे, याकरीता या तंत्राचा वापर करण्यात आला आहे. डिजिटल आर्ट व्हिआरई चे संचालक अजय पारगे यांनी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, ट्रस्टतर्फे दिलेल्या http://www.DagdushethGanpati.net या लिंकवर जाऊन घरी भक्ताने आरती करतानाचा व्हिडिओ काढल्यास प्रत्यक्ष दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभा-यात श्रीं ची आरती करतानाचा व्हिडिओ तयार होत आहे. आपण गाभा-यात उभे राहून प्रत्यक्ष आरती करीत असल्याचा आनंद व्हिडिओ पाहून भक्तांना घेता येत आहे. भारतासह अमेरिका, कॅनडा, आॅस्टेÑलिया, युके, युएई, सिंगापूर, जर्मनी, कतार, न्यूझिलंड, ओमान, आर्यलंड, नेदरलँड, मलेशिया, स्विडन, जपान, नायजेरिया, सौदी अरेबिया अशा सुमारे ६० देशांतील भक्तांनी या तंत्राचा वापर केला आहे.

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, विधानपरिषदेच्या उपसभापती आमदार डॉ. नीलम गो-हे, स्वामी गोविंददेवगिरी महाराज, माजी सेनाधिकारी डी.बी.शेकटकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ संगणकतज्ञ डॉ.विजय भटकर, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, तरिता शंकर, राजू सांकला, अभिनेते प्रशांत दामले यांसह समाजातील अनेक मान्यवरांनी या तंत्रज्ञानाचा वापर करुन बाप्पाची आरती करण्याचा व व्हिडिओद्वारे अनुभविण्याचा आनंद घेतला आहे. भाविकांनी या तंत्राचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन ट्रस्टने केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: