गणेश मंडळांचा गणरायाला ५०० पुस्तकांचा महानैवेद्य

पुणे : आजच्या डिजीटल युगात मुलांमध्ये पुस्तक संस्कृती रुजविण्यासाठी  पुण्यातील गणपती मंडळांनी पुढाकार घेत अनोखा उपक्रम राबविला आहे. बुद्धीची देवता गणरायाला ५० हून अधिक मंडळांनी ५०० पुस्तकांचा महानैवेद्य अर्पण केला असून गणरायाच्या या नैवेद्याचे पुण्यातील आदिवासी भागातील वस्ती, दुर्गम भागात आणि विविध सामाजिक संस्थांमध्ये वाटप करण्यात येणार आहे.

बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्ट तसेच जय गणेश व्यासपीठाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ साहित्यक श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुस्तकांचे पूजन करण्यात आले. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, साईनाथ मंडळाचे अध्यक्ष पियूष शहा उपस्थित होते. तसेच जय जवान मंडळाचे अमोल सारंगकर,  विधायक मित्र मंडळाचे अभिषेक मारणे, वीर शिवराज मंडळाचे किरण सोनिवाल, नवज्योत मित्र मंडळाचे अमित जाधव, विधायक मित्र मंडळाचे अभिषेक मारणे, व्यवहारआळी मंडळाचे संतनू पातस्कर, राष्ट्रीय साततोटी मंडळाचे स्वप्नील दळवी यांचा प्रातिनिधीक स्वरूपात सन्मान करण्यात आला. उपक्रमाची संकल्पना मंडळाचे अध्यक्ष पियुष शाह यांची होती. ग्रंथपाल प्रसाद भडसावळे, राजीव पातस्कर, साईनाथ मंडळाचे अमर राव, राजू शेडगे, नंदू ओव्हाळ, गणेश नाईक, प्रतीक निंबाळकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

श्रीपाल सबनीस म्हणाले, ज्ञानात्मक संस्कृती हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. तसेच बहुसांस्कृतिक एकतेचे उदाहरण हे गणपती मंडळांमध्ये पहायला मिळते. आज माणुसकी ठेऊन जगण्याची गरज आहे. कारण जातीवादाने पेटलेल्या विश्वात्मक जगाच्या नकाशाला शांत करण्यासाठी बहुधर्मिक, बहूसांस्कृतिक विश्वात्मक शांततेची गरज आहे. माणूस जेवढा प्रगल्भ होईल तेवढ्या प्रमाणावर जग शांत राहील, विकसित होईल. विकासात माणसाच्या भौतिक प्रश्नांची उत्तरे दडली आहेत. माणसातील देवत्व जपलं पाहिजे. त्यासाठी सत्याची आणि ज्ञानाची कास धरली पाहिजे. भारतीय संस्कृती ही सत्य पूजक आहे. तत्वज्ञानात्मक समतेचे सामर्थ्य समजून घेण्यासाठी मार्गदर्शक म्हणून गणेशाची पूजा केली पाहिजे. म्हणून गणरायाला एका ठराविक जातीचे किंवा धमार्चे समजून त्यांचे देवत्व संकुचित करणे चुकीचे आहे. गणपती सर्वांची देवता आहे.

पियुष शाह म्हणाले, आजच्या डिजीटल युगात आॅनलाईन गोष्टींचा जास्त वापर केला जातो. त्यामुळे कुठेतरी वाचन संस्कृती मागे पडत आहे. येणाºया पिढीमध्ये ही वाचन संस्कृती पुन्हा एकदा रुजली पाहिजे याकरीता या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Leave a Reply

%d bloggers like this: