या आठवड्यात लिटिल चॅम्प्समध्ये रंगणार अजय-अतुल विशेष भाग

सारेगमप लिटिल चॅम्प्स हा कार्यक्रम आणि त्यातील १४ भन्नाट स्पर्धक हे महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. या स्पर्धकांनी अगदी पहिल्या भागापासूनच पंचरत्नांसोबत प्रेक्षकांना देखील आपल्या टॅलेंटने अगदी थक्क केलं आहे. प्रत्येक आठवड्यात हे स्पर्धक आपल्या सुमधुर गाण्यांनी माहोल बनवतात. या आठवड्यात देखील माहोल बनणार आहे कारण सर्व लिटिल चॅम्प्स या आठवड्यात लोकप्रिय संगीत दिग्दर्शक अजय-अतुलची गाणी सादर करणार आहेत. अजय-अतुल यांची लोकप्रिय गाणी सादर करून सर्व स्पर्धक पंचरत्न आणि प्रेक्षकांना याड लावणार यात शंकाच नाही.
या आठवड्यात देखील काही विशेष पाहुणे या सर्व स्पर्धकांचं कौतुक करण्यासाठी सज्ज होणार आहेत. सुप्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव आणि नागराज मंजुळे लिटिल चॅम्प्सच्या मंचावर हजेरी लावणार आहेत. कार्यक्रम सुरु झाल्यापासून आता पर्यंत सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या मंचावर एकही एलिमिनेशन झालं नाही, पण आता या आठवड्यापासून ज्या स्पर्धकांकडे सगळ्यात कमी गोल्डन तिकीट आहेत ते स्पर्धक डेंजर झोनमध्ये जातील. डेंजर झोनमध्ये असलेले स्पर्धक आपल्या उत्तम परफॉर्मन्सने डेंजर झोनच्या बाहेर देखील येऊ शकतात. त्यामुळे या आठवड्यापासून सर्व स्पर्धकांवर डेंजर झोनचं सावट आहे असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही. या कार्यक्रमाला आता खऱ्या अर्थाने स्पर्धेचं स्वरूप येणार आहे. त्यामुळे या आठवड्यात कुठले लिटिल चॅम्प्स गोल्डन तिकीट मिळवतील, कुठले स्पर्धक डेंजर झोन मध्ये असतील हे पाहणं औस्त्युक्याच ठरेल.

Leave a Reply

%d bloggers like this: