गणेशोत्सव मंडळांनी लसीकरणाच्या कामाला प्राधान्य द्यावे – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

पुणे : कोविडच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या वतीने लसीकरणाचे काम सुरु आहेत. ज्यांचे दोन डोस झाले आहेत, त्यांना बाधा होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे लसीकरण हे कोविडवरील एक प्रकारचे कवच आहे. गणेशोत्सवात गणेश मंडळांना माणुसकी धर्म पाळून पुण्य मिळवायचे असेल, तर गणेशोत्सव मंडळांनी लसीकरणाच्या कामाला प्राधान्य द्यायला हवे. त्याचा मोठा फायदा होईल, असे मत महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.

पुणे परिवारतर्फे लोकमान्य जीवनगौरव, आदर्श गणेशोत्सव कार्यकर्ता आणि गणेश सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन नवी पेठेतील पत्रकार भवन येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे, पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, पुणे परिवाराचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रताप परदेशी, विनायक घाटे, शिरीष मोहिते आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

लोकमान्य जीवनगौरव पुरस्कार त्वष्टा कासार समाज संस्थेचे अध्यक्ष सुरेश पोटफोडे, गणेश सेवा पुरस्कार शिल्पकार विवेश खटावकर यांना प्रदान करण्यात आला. तर, आदर्श गणेशोत्सव कार्यकर्ता पुरस्कार किरण सोनिवाल, अनिरुद्ध येवले, प्रमोद राऊत, अमित जाधव, प्रशांत मते, स्वप्नील दळवी यांना प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, शाल, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते. अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ नंदू घाटे, आयएमए चे माजी अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे, पोलीस नाईक सतिश गाडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

दिलीप वळसे पाटील म्हणाले, कै.तात्यासाहेब गोडसे व कै.तात्यासाहेब थोरात यांनी गणेशोत्सवाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार गणेश मंडळे आज विधायक कार्य करीत आहेत. सर्वच गणेश मंडळांनी त्याप्रमाणे कार्य करायला हवे. कोरोना गेला आहे, ही भूमिका उचित नाही. भविष्यात मोठे नुकसान होऊ द्यायचे नसेल, तर नियम पाळणे गरजेचे आहे. सण-उत्सवाच्या नावाखाली आपण जी गर्दी करतो, त्यातून जास्त पसरण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

अमिताभ गुप्ता म्हणाले, मागील वर्षी देखील पुण्याने गणेशोत्सवात सहकार्य केले. यंदा देखील नाईलाज असून सहकार्याची अपेक्षा आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही उत्सवावर बंधने आहेत. परंपरा सोडून काम करावे लागत असले, तरी देखील निर्बंधांचे पालन आपण सगळे करुया, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: