नारायण राणे यांच्या पत्नी आणि मुलाविरोधात लूकआऊट सर्क्युलर जारी

पुणे : केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि मुलगा आमदार नितेश राणे यांच्याविरोधात पुणे क्राईम ब्रँचकडून लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आली आहे. नितेश राणे आणि त्यांच्या आईच्या नावाने डीएचएफएल कंपनीकडून 40 कोटींचं कर्ज घेण्यात आलं होतं. पण त्यापैकी 25 कोटींच्या कर्जाची परतफेड न करण्यात आल्याने डीएचएफएल कंपनीकडून पोलिसात तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी कोर्टाच्या आदेशानंतर लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं आहे. राणे कुटुंबियांनी आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसाठी कर्ज घेतलं. या कंपनीच्या कर्जासाठी नीलम राणे आणि नितेश राणे सहअर्जदार आहेत.

महत्वाची बाब म्हणजे हे कर्ज खातं हे मुंबईचं आहे. मग पुणे पोलिसांनी कारवाई कशी केली? असा प्रश्नही विचारला जात आहे. दरम्यान, डीएचएफएलनं तक्रार दिली होती. त्यामुळे राहिलेलं कर्ज न देता राणे कुटुंब परदेशात जाऊ शकतं, त्यामुळे हे लूकआऊट सर्क्युलर देण्याचा आल्याचं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले,  या संदर्भात केंद्र सरकारकडून एक पत्र गृह  विभागाला प्राप्त झालं होतं. ते आम्ही पुणे पोलीसांना दिले आणि  त्यानुसार लुकआऊट सर्क्युलर दिले आहे.

भाजप नेते  अतुल भातखळकर म्हणाले, मला या बाबत अद्याप काही माहिती आलेली नाही. पण जर नारायण राणेंच्या पत्नी आणि मुलाविरुद्ध लूकआऊट नोटिस दिले असेल तर हे केवळ राजकीय सूडबुद्धीने राज्य सरकार कारवाई करत आहे. नारायण राणेंना ज्या बेकायदेशीर पद्धतीने अटक करण्यात आली होती. त्याचेच हे राज्य सरकारचे पुढील पाऊल आहे.

लूकआऊट सर्क्युलर म्हणजे काय?

लूकआऊट सर्क्युलर हे साधारणपणे नजर ठेवण्यासाठी बजावण्यात येतं. राणे कुटुंबाला बजावण्यात आलेल्या लूकआऊट सर्क्युलरमध्ये असं सांगण्यात आलं आहे. यांची अरायव्हल आणि डिपार्चरची माहिती पुणे पोलिसांना देण्यात यावी. म्हणजे तुम्ही यांच्यावर नजर ठेवून राहा अशी सूचनाच एकप्रकारे लूकआऊट सेलला देण्यात येते.

दरम्यान, हे लूकआऊट सर्क्युलर राजकीय कारवाई असून संबंधित बँकेला आम्ही 5 महिन्यांपूर्वी लोन सेटलमेन्ट साठी अर्ज दिलेला आहे असे स्पष्टीकरण आमदार नीतेश राणे यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना दिले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: