कट्टरतावादाची पाळंमुळं आर्थिक,राजकीय सत्तेत आहेत -किरण मोघे

पुणे :  “कट्टरतावाद हा धर्माचे आवरण पांघरून येत असला तरी त्याची पाळंमुळं आर्थिक- राजकीय सत्तेत आहेत. आर्थिक राजकीय सत्ता काबीज करणं हा कट्टरतावादाचा हेतू आहे, धर्म केवळ निमित्तमात्र आहे” असे प्रतिपादन काॅ. किरण मोघे यांनी शहिद गौरी लंकेश यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘डाॅ. नरेंद्र दाभोलकर विचार जागर विशेषांका’च्या ऑनलाईन प्रकाशन कार्यक्रमात “कट्टरतावादाचे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आव्हान” ह्या विषयावर बोलताना केले.

या प्रसंगी बोलताना डाॅ. शैला दाभोलकर म्हणाल्या, “डाॅ. नरेंद्र दाभोलकर गेल्यानंतर व कोव्हीड काळात आपल्यासमोर अनेक अडचणी आल्या. मात्र तुम्ही सर्वांनी या अडचणीं केलेली मात मी पाहिली आहे. विचाराला कृतीची जोड असली पाहिजे, यासाठी डाॅ. दाभोलकर आग्रही होते. त्याचे दर्शन या अंकातून घडत आहे. मला तुम्हा सर्वांचे कौतुक वाटते आज डाॅ. दाभोलकर आपल्यात असते तर त्यांनाही तुमचे कौतुक वाटले असते.”

किरण मोघे यांनी कट्टरतावाद कसा पेरला जातो, त्यांचा आर्थिक राजकीय हितसंबंधासाठी कसा वापर केला हे, सध्याच्या घडीला चर्चेत असलेल्या तालीबानी दहशतवादाची उदाहरणे देऊन स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, “तेलाचे साठे अमेरिकेसाठी अहमं आहेत. 1978 साली अफगाणिस्तानात सोव्हिएत युनियनच्या मदतीने लोकशाहीवादी डावा पक्ष सत्तेत आला. मात्र त्या विरूद्ध कुरापती काढण्यासाठी अमेरीकेने हा तालिबानी दहशतवाद पोसलेला आहे. लोकशाहीच्या नावाने गळे काढणारी अमेरिका सौदी अरेबियासोबत मैत्री करते, जिथे महिलांना अत्यंत हीन दर्जाची वागणूक मिळते. खुद्द अमेरिकन पत्रकाराची सौदी अरेबियात तुकडे तुकडे करून हत्या करण्यात आली होती, त्या विरूद्ध अमेरिकेने एक शब्द उच्चारला नाही.”

किरण मोघे म्हणाल्या, “डॉ. दाभोलकर, काॅ. पानसरे, प्रा. कलबुर्गी, लंकेश यांच्या हत्याही याच कट्टरतावाद्यांनी थंड डोक्याने, नियोजनबद्धपणे केल्या आहेत. या चौघांसारखे इतर अनेक सर्वसामान्यही या कट्टरतावादाचे बळी आहेत.” असे सांगून पुढे त्या म्हणाल्या, “2014 ला मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर पुण्यात पहिले माॅब लिन्चिग मोहसिन शेख यांचे झाले. त्यानंतर अशा इतक्या घटना घडल्या आहेत की अशा घटनांबाबत आपल्याला काहीच वाटेनासे झाले आहे. इतके निर्ढावलेपण कट्टरतावादाने आपल्यात निर्माण केले आहे. यावर उपाय म्हणजे जनतेच्या प्रश्नावर काम करणाऱ्या संघटनांनी एकजूट करून कट्टरतावादाला सत्तेपासून दुर ठेवले पाहिजे तसेच वास्तव समजून घेण्यासाठी आपला अभ्यास, वाचन वाढवले पाहिजे.”

 

Leave a Reply

%d bloggers like this: