कथाकथन हे संस्कारांचे प्रभावी माध्यम – डॉ. न.म.जोशी
पुणे : जगातील आजची परिस्थिती पाहता उद्याच्या पिढीचे काय अशी चिंता आपल्याला वाटली पाहिजे. पुढील पिढीवर चांगले संस्कार होण्याकरीता देशासाठी बलिदान दिलेल्या आणि देश घडविण्यासाठी झटलेल्या क्रांतिकारकांच्या कथा त्यांना कळायला हव्यात. कोविडसह अनेक समस्यांनी ग्रस्त असलेल्या आपल्या समाजात उद्याची पिढी घडविण्याचे प्रभावी माध्यम म्हणून कथाकथनाचा जागर केला पाहिजे. कथाकथन हे संस्कारांचे प्रभावी माध्यम आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न.म.जोशी यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, बालक संस्थेच्यावतीने शिक्षकदिनाचे औचित्य साधून साहित्य, संस्कृती व शिक्षण या क्षेत्रात प्रदीर्घकाळ कार्य करणाºया व्यक्तींना बालक मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. बाजीराव रोड येथील महाराष्ट्र राष्ट्र भाषा प्रचार समितीच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रभाषा प्रचार समितीचे ज.गं. फगरे, संस्थेचे कार्याध्यक्ष शिरीष जोशी, उपकार्याध्यक्षा हेमलता वडापूरकर, माधवी जोशी, संस्थेचे संस्थापक सदस्य सल्लागार मा.बा. पारसनीस, धनंजय ओक, अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या अध्यक्ष डॉ.संगीता बर्वे, अक्षरभारतीचे माधव राजगुरु, संवादचे सुनील महाजन व बालक संस्थेच्या कार्यकारिणीचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी डॉ. दिलीप गरुड व मुकुंद तेलीचरी यांना बालक मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मानपत्र, शाल, श्रीफळ व पाच हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.
डॉ. न.म जोशी म्हणाले, डॉ. दिलीप गरूड आणि मुकुंद तेलीचरी यांच्यासारखे शिक्षक गेली तीन दशके निरपेक्षपणे कथाकथनातून मुलांसाठी काम करीत आहेत. त्यांचा आदर्श मुलांसाठी काम करणाºयांनी आणि शिक्षकांनी घ्यावा. कोणत्याही संस्थेत काम करताना पद, पैसा, प्रसिध्दी आणि पदकाची अपेक्षा न करता संस्थेवर प्रेम करा, असेही त्यांनी सांगितले.
पुरस्काराला उत्तर देत डॉ. दिलीप गरुड म्हणाले, पुरस्कार मिळताना त्याबरोबर सन्मान, धन, कौतुक आणि प्रतिष्ठा मिळते. परंतु त्याहीपलिकडे जावून आणखी चांगले काम करण्याची उर्जा मिळते आणि जे काम करीत आहोत ते योग्य असल्याची जाणीव देखील होते. शिक्षक म्हणून मुलांना घडविताना त्यांच्याबरोबर प्रत्येकवेळी आपणही घडत असतो. शाळा, विद्यार्थी आणि शिक्षक जसे आपल्याला घडवितात तसेच आपले अनुभव देखील आपल्याला घडवित असतात, असेही त्यांनी सांगितले.
हेमलता वडापूरकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. श्रीकांत चौगुले यांनी सूत्रसंचालन केले, शिरीष जोशी यांनी आभार मानले.
