fbpx
Sunday, May 19, 2024
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षक खुर्शिद शेख आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शिक्षक उमेश रघुनाथ खोसे यांना उल्लेखनीय योगदानासाठी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर दूरदृष्य प्रणालीद्वारे ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार-2021’ चे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास राष्ट्रपती भवनातून राष्ट्रपती तर शास्त्रीभवन स्थित शिक्षण मंत्रालयातून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, शिक्षण राज्यमंत्री सर्वश्री अनुपमा देवी, डॉ.सुभास सरकार आणि डॉ. राजकुमार रंजन सिंग उपस्थित होते.

देशाच्या विविध भागातून या कार्यक्रमात सहभागी 44 शिक्षकांना उल्लेखनीय योगदानासाठी विविध श्रेणींमध्ये  गौरविण्यात आले. गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील आसरअली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक खुर्शिद शेख आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातील कडदोरा (जगदंबानगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक उमेश रघुनाथ खोसे यांनाही यावेळी गौरविण्यात आले.

गडचिरोली जिल्ह्याच्या आसरअली येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व उपक्रमशील शिक्षक खुर्शीद शेख यांनी शिक्षण क्षेत्रात आपल्या कार्याचा वेगळाच ठसा उमटविला आहे. श्री.शेख या भागातील आदिवासी मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. भाषेच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना येत असलेली अडचण दूर करण्यासाठी श्री.शेख  यांनी ‘मी सुद्धा रिपोर्टर’ हा उपक्रम यशस्वीरित्या राबविला. त्यांनी शिक्षणातील नवनवीन उपक्रमांचे अवलंबन करून आपल्या शाळेत महत्त्वपूर्ण बदल घडविले आहेत. विद्यार्थ्यांना सर्वांगीण  शिक्षण देण्यासाठी शाळेत आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विविध शैक्षणिक उपक्रमांद्वारे त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घडवून आणला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कडदोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक उमेश खोसे यांनी ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शिक्षण उपलब्ध करून दिले. श्री.खोसे यांनी परिसरातील १०० टक्के विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यात यश मिळविले. विद्यार्थ्यांना शिक्षणाची उत्तम साधने उपलब्ध करून देण्यासाठी डिजिटल क्लासरुम तयार केली. तांड्यावर मुलांना ऑफलाइन शिकता यावे यासाठी स्वतंत्र ५१ऑफलाइन ॲपची निर्मिती केली. व्हिडिओ निर्मिती करून विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. तांड्यावरील मुलांना त्यांच्याच भाषेतून शिक्षण मिळावे यासाठी पहिलीचे पुस्तक अनुवादित करून त्याचे डिजिटल साहित्यही निर्माण केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading