फिक्की फ्लोच्या वतीने शहरातील सैन्य दलाच्या आस्थापनांना करण्यात आली तिरंगी रोषणाई

पुणे : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन अर्थात फ्लो या संस्थेच्या पुणे चॅप्टरच्या वतीने शहरातील सैन्य दलाच्या (मिलिटरी) आस्थापनांना कायमस्वरूपी  तिरंग्याच्या रंगातील रोषणाई  करण्यात आली आहे. भारतीय सैन्याप्रती आदर व्यक्त करीत अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त फिक्की फ्लोच्या वतीने सदर उपक्रम हाती घेण्यात आला असल्याची माहिती फ्लो पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा उषा पूनावाला यांनी दिली. या उपक्रमा अंतर्गत कॅम्प परिसरातील दक्षिण मुख्यालयाचे मुख्य प्रवेशद्वारावर, फिल्ड मार्शल सॅम मानेक शॉ यांचा पुतळा, राष्ट्रीय युद्ध संग्रहालय, द क्लॉक टॉवर व जनरल अरुणकुमार वैद्य स्मारक आदी आस्थापनांचा समावेश आहे.

आर्मी वाईव्ज वेलफेअर असोसिएशन अर्थात एडब्लूडब्लूएच्या मदतीने फिक्की फ्लो पुणे चॅप्टर हा देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शहीद जवानांच्या विधवा पत्नींसाठी काम करण्यास प्रयत्नशील असतो. या अंतर्गत स्वातंत्र्यदिनानिमित्त फिक्की फ्लो पुणे चॅप्टरच्या वतीने सहा शहीद सैनिकांच्या विधवा पत्नींना शिलाई मशीन भेट देण्यात आल्या. फिक्की फ्लोच्या राष्ट्रीय अध्यक्षा उज्ज्वला सिंघानिया व आर्मी वाईव्ज वेलफेअर असोसिएशनच्या विभागीय अध्यक्षा अनिता नैन यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला. आजवर विविध उपक्रमा अंतर्गत  फिक्की फ्लोच्या वतीने सैन्य दलात कार्यरत असलेल्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात दिला गेला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: