Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राज्यात यंदाही दहीहंडी नाहीच; मुख्यमंत्र्यांचा गोविंदा पथकांशी ऑनलाईनसंवाद

मुंबई : काही काळासाठी आपले सणवार, उत्सव बाजूला ठेऊन जनतेचे प्राण वाचवण्याला महाराष्ट्राने प्राधान्य दिले हा संदेश आपण सर्वमिळून जगाला देऊ या, संयम  आणि धीराने आधी कोरोनाला हद्दपार  करूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  केले. त्यांनी  आज  शासनाचे प्रथम प्राधान्य हे जनतेचे प्राण वाचवण्याला आहे, हे देखील स्पष्ट केले. 

आज राज्यातील गोविंदा पथकांशी ऑनलाईन बैठकीत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला तेंव्हा ते बोलत होते.  उपस्थित दहीहंडी पथकांच्या पदाधिकाऱ्यांनीही मुख्यमंत्र्याच्या कळकळीच्या विनंतीला प्रतिसाद देत दहीहंडीऐवजी कोरोनाचे सावट लक्षात घेऊन सामाजिक तसेच आरोग्य विषयक उपक्रम हाती घेऊन हा उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करू  अशी भावना व्यक्त केली.

बैठकीस  उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, परिवहन मंत्री अनिल परब, आमदार सुनील प्रभू,  आ. प्रताप सरनाईक,  माजी मंत्री सचिन अहीर, माजी आमदार बाळा नांदगांवकर, मुख्य सचिव सीताराम कुंटे,  गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव,   आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे,  बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आय.एस.चहल, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे,  टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी,  डॉ. राहूल पंडित, बाल टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभु, डॉ. अजित देसाई उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, सणवार, उत्सवाबाबतच्या आपल्या सर्वांच्या भावना सारख्याच आहेत पण आज विषय आरोग्याचा आणि नागरिकांचे प्राण वाचवण्याचा आहे. त्यामुळे जेंव्हा पहिले प्राधान्य कशाला द्यायचे हा प्रश्न समोर येतो तेंव्हा साहजिकच पहिल्यांदा आरोग्याचा विचार करावा लागतो.  मागील दीड वर्षांपासून आपण कोरोना विषाणुविरूद्ध लढत आहोत, त्यामुळे आपल्यावर बंधने आली आहेत, पण ही बंधने कुणासाठी याचा देखील विचार करण्याची गरज आहे. या निर्बंधाविरुद्ध आंदोलन करण्याचे काहीजण बोलतात. त्यांनी शासनाविरोधात आंदोलन करण्यापेक्षा कोरोनाविरुद्ध आंदोलन करावे.

सगळे जग या विषाणुने त्रासेलेले आहे. गेल्या दोन लाटेत जी बालके अनाथ झाली, ज्यांच्या घरातील कर्ते पुरुष किंवा महिला गेल्या, कुटुंबच्या कुटुंब अनाथ झाली,  त्याची कारणे समजून घेण्याची गरज आहे. दोन लाटेतला आपला अनुभव भयानक आहे. आपलाच नाही तर जगाचा अनुभवही कटु आहे. दोन डोस दिलेल्या देशातही तिसऱ्या लाटेने आता कहर मांडला आहे. अनेक देशात पुन्हा निर्बंध लावले जात आहेत.

नीती आयोगाने परवाच आपल्या अहवालात तिसऱ्या लाटेची शक्यता  आणि लागणाऱ्या आयसीयु बेडची संख्या याचा अंदाज व्यक्त करून आपली काळजी वाढवली आहे.  हा विषाणु घातक आहे. अजून आपल्याकडे ठोस औषध उपलब्ध नाही पण कोरोनाला रोखण्याचा मार्ग आपल्याला कळला आहे. आपल्याकडेही काही जिल्ह्यात दुसरी लाट जोरात आहे. काही ठिकाणी संसर्ग कमी झालेला दिसत असला तरी आपल्यासाठी हा “विंडो पिरियड” आहे. ज्याचा उपयोग आपल्याला आपलं अर्थचक्र सुरळित ठेवण्यासाठी आणि तळहातावर पोट असलेल्यांना दिलासा देण्यासाठी करावयाचा आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading