Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

वाड्मयीन पत्रव्यवहारासंदर्भातल्या अभ्यासाकडे मराठी समीक्षेचे दुर्लक्ष; डॉ. अंजली सोमण यांची खंत

पुणे : साहित्यिकांच्या पत्रव्यवहाराचा अभ्यास गेली वीस वर्षे मी करत आहे. पत्र हा अस्सल पुरावा असतो. पाश्चात्य जगात पत्र व्यवहाराला विलक्षण महत्त्व आहे. लेखकाचे व्यक्तिमत्त्व आणि सामाजिक परिस्थिती यांचे अनोखे दर्शन पत्रव्यवहारातून घडत असते. पत्रव्यवहारासंदर्भातल्या माझ्या अभ्यासाकडे मराठी साहित्य समीक्षेने दुर्लक्ष केले अशी खंत ज्येष्ठ लेखिका आणि भाषा अभ्यासक डॉ. अंजली सोमण यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार डॉ. सोमण यांना साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, कार्यवाह बंडा जोशी, पराग जोगळेकर आणि उज्ज्वला जोगळेकर यावेळी उपस्थित होते.

 डॉ. सोमण म्हणाल्या, ‘गं. बा. सरदार यांनी मला साहित्याच्या सामाजिक अभ्यासाची गरज लक्षात आणून दिली. समाजाशी जिवंत संबंध असावा म्हणून मी स्त्री मुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, युक्रांद अशा चळवळीमध्ये सहभागी झाले. त्यामुळे मला समकालीन प्रश्नांचे भान आले. माझे सर्जनशील तसेच समीक्षा लेखन साहित्याचा सामाजिक अंगाने विचार करणारेच आहे.

कोत्तापल्ले म्हणाले, ‘पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रीयांच्या लेखनाकडे दुर्लक्ष झाले. कलावंतांनी अपेक्षा न ठेवता निर्मिती करावी. ज्ञानाला सामोरं जाण्याची वृत्ती कमी होत चालली आहे.’

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ‘संस्थात्मक कार्याकडे पाहण्याचा समाजाचा नकारात्मक दृष्टीकोन आणि साहित्य क्षेत्रांतील प्रतिसादशून्यता चिंताजनक आहे डॉ जोगळेकर यानी संस्थात्मक कार्याचा आदर्श वस्तुपाठ निर्माण केला..’ प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले. बंडा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading