महाराष्ट्रात ओबीसी’चे राजकीय आरक्षण काढून सरकारने मोठा अन्याय केला- दौलत शितोळे
पुणे : महाराष्ट्रात ओबीसी चे राजकीय आरक्षण काढून जो अन्याय सरकारने केला आहे त्या विषयी जनआंदोलन करण्याच्या भूमिकेतून आजची बैठक घेण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस सरकारने उमाजी नाईक व रामोशी समाजाला न्याय देण्याचे काम केले. आज ओबीसी आरक्षण संदर्भातील त्याची भुमिका देखील आम्हाला मान्य आहे त्यामुळे भविष्यात राज्यव्यापी आंदोलन करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने आम्ही एकमत राहू, अशी स्पष्ट भुमिका जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष दौलत शितोळे यांनी व्यक्त केली.
जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याची राज्य कार्यकारिणी बैठक सुपे, जि. पुणे येथे संपन्न झाली. जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष दौलत शितोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत प्रमुख्याने ओबीसी / पदोन्नती आरक्षण संदर्भात चर्चा करण्यात आली सोबतच संघटनेच्या मागील कामाचा आढावा प्रत्येक जिल्हा अध्यक्षांच्या वतीने देण्यात आला, संघटनात्मक बदल यावर चर्चा तसेच ऐनवेळी येणार्या विषयावर देखील चर्चा करण्यात आली. सदर बैठकीला संपूर्ण महाराष्ट्रातून जय मल्हार क्रांती संघटनेचे सर्व जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याच्या सर्व आघाड्या, समिती, मंडळ, पदाधिकारी, सदस्य तसेच सर्व आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकी दरम्यान महाराष्ट्र राज्यच्या कोर कमिटी अध्यक्ष पदी रामदास धनवटे ,महाराष्ट्र युवक अध्यक्ष रोहिदास जाधव व राज्य कार्यकारणी सदस्य पदी महेश जाधव याची निवड करण्यात आली. सदर बैठकीत संघटनेतील पुढील वाटचाल यावरती ज्येष्ठ पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले. यात प्रामुख्याने उपाध्यक्ष अंकुशराव जाधव व कार्याध्यक्ष संजय जाधव यांनी आपली मनोगते व्यक्त केली, ओबीसी आरक्षण हे समाजाला मिळालेच पाहिजे अशी भूमिका यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत शितोळे व्यक्त केली.
