‘इंडिया टुडे’चा अँकर राहुल कंवलचा माफीनामा; शिवसेनेबद्दल दिली होती चुकीची बातमी

नवी दिल्ली, दि. ४ – अदर पुनावाला यांनी आपल्याला धमक्या येत असल्याचे म्हटले होते. यासंदर्भात चॅनलवरील चर्चेदरम्यान शिवसेनेवर खोटे आरोप करणे इंडिया टुडेचा अँकर राहुल कंवलला चांगलेच भोवले आहे. शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावर जाहीर माफी मागण्याबाबत इंडिया टुडेला पत्र पाठवून सुनावले. त्यानंतर या अँकरला शिवसेनेची जाहीर माफी मागावी लागली असून आपण शिवसेनेच्या नव्हे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्याविषयी बोललो, असे स्पष्टीकरण राहुल कंवल यांने दिले आहे.

सीरम इन्टिटयूटचे अदर पुनावाला यांनी धमकीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर इंडिया टुडेवर एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रादरम्यान इंडिया टुडेचे सूत्रसंचालक राहुल कंवल यांनी शिवसेनेविषयी चुकीचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून शिवसेनेची नाहक मानहानी होत असल्याने शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी इंडिया टुडेला पत्रक पाठवून जाहीर माफी मागण्यास सांगितले. सुभाष देसाई यांनी लिहिलेल्या पत्रात त्यांनी ‘राहुल कंवल यांनी इंडिया टुडे वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान अदर पुनावाला यांना शिवसेनेच्या गुंडांनी लसीसाठी धमकावल्याचे म्हटले.

ही गोष्ट धादांत खोटी आणि बदनामीकारक आहे. शिवसेनेची प्रतिमा मलीन करण्याच्या कटाचा हा भाग वाटतो. कदाचित या माध्यमातून सध्या देशभरात सुरु असलेले कोरोनाचे थैमान आणि विधानसभा निवडणुकीच्या निकाल या विषयांवरील लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.आमचा ‘इंडिया टुडे’ समूहाच्या पत्रकारितेवर विश्वास आहे. त्यामुळे राहुल कंवाल यांनी याबद्दल जाहीर माफी मागावी, असे म्हटले होते. या पत्रानंतर तत्काळ इंडिया टुडेच्या सूत्रसंचालकाला माफी मागावी लागली.

सुभाष देसाई यांच्या पत्रानंतर सूत्रसंचालक राहुल कंवल याने माफी मागितली. काल वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान मी सिरम इन्स्टिटय़ूटला धमकावत असणाऱया नेत्याबद्दल बोललो. तो व्हीडिओ शिवसेनेचा नव्हे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा होता. यामुळे झालेला गोंधळ आणि मनस्तापासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो, असे राहुल कंवल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: