युवकांनी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याची ताकद ठेवा-आमदार रोहित पवार

पुणे :  आजच्या युवकांमध्ये महत्त्वाकांक्षा जास्त आहेत. त्यांची अनेक स्वप्ने असतात. ही स्वप्ने बघण्यात त्यांची इतकी उर्जा जाते की, महत्त्वाकांक्षा सत्यात उतरविण्यासाठी उर्जा  शिल्लक राहत नाही.  मग युवापिढी तणावाखाली जायला लागते. परंतु तणावामुळे कोणत्याही अडचणी  दूर करता येत नाही. त्यामुळे महत्त्वकांक्षा ठेवा पण त्या पूर्ण करण्याची क्षमता देखील ठेवा त्यासाठी मेहनत करा, असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. 

स्टारविन्स ग्रुप च्या वतीने बालगंधर्व कलादालन येथे स्टारविन्स आर्ट फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. फेस्टिवलचे उद्घाटन रोहित पवार आणि अभिनेते गिरीश परदेशी यांच्या हस्ते झाले. यावेळी पवार यांच्या हस्ते क्षण पुरस्कार प्रदान करण्यात आले. स्टारविन्स ग्रुपचे प्रणव तावरे, राज लोखंडे आणि स्वरदा देवधर उपस्थित होते. प्रदर्शनाचे यंदा ५ वे वर्ष आहे. 
आंतरराष्ट्रीय धनूर्विद्यापटू स्वप्निल ढमढेरे, सहाय्यक पोलिस आयुक्त विजय चौधरी, कवी वैभव जोशी, अभिजीत मुथा, छायाचित्रकार आशिष काळे यांना क्षण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सन्मानपत्र, रोप, शाल असे पुरस्काराचे स्वरुप होते. 

रोहित पवार म्हणाले, काहीजण कलाकार असतात तर काही जणांना कलेची अनुभूती घ्यायला आवडते. जे कलाकार आहेत त्यांच्या कलेला प्रोत्साहन देत व्यासपीठ देखील द्यायला हवे. युवा ताकद सगळ्यांना दिसायला हवी. कलाकारांना प्रोत्साहित करणे ही आपली जबाबदारी आहे. कलाकारांनी देखील आपली कला इतरांना द्यायला हवी. कला ही लोकांना दिल्याने वाढते. स्टारविन्स आर्ट फेस्टिव्हलमध्ये उत्कृष्ट छायाचित्रे, पेंटिंग्ज पाहायला मिळाले. क्षण टिपण्यासाठी चांगले इक्विपमेंट असावेच असे नाही तर कला असली कि साध्या मोबाइलमध्ये देखील चांगला फोटो काढता येतो, असेही त्यांनी सांगितले.

दिनांक २७ फेब्रुवारी २०२१ पर्यंत सकाळी १० ते ८ या वेळेत पुणेकरांसाठी फेस्टिवल व क्षण, कलाधिपती प्रदर्शन विनामूल्य खुले असणार आहे.  या फेस्टिवलमध्ये देशभरातून विविध छायाचित्रकारांनी काढलेली छायाचित्रे तसेच रेखाटलेली  पेंटिंग्स पाहायला मिळणार आहेत. अभिनेते गिरीष परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले. राज देशपांडे यांनी निवेदन केले. राज लोखंडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: