निरक्षीर विवेकबुद्धि शाबूत ठेवून उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करण्याचा चपराकचा वस्तुपाठ – प्रा. कुलकर्णी

पुणे – वाचनसंस्कृती कमी होतेय, प्रकाशकांचे खूप हाल होत आहेत, प्रकाशनसंस्था मोडकळीस आल्यात, त्यात कोरोनामुळे आणखी मोठा फटका बसलाय असे सगळे चित्र रंगवले जात असताना या पार्श्वभूमिवर चपराक प्रकाशनची मात्र जोरदार घोडदौड सुरू आहे आणि सातत्याने विविध विषयांवरील दर्जेदार पुस्तके ते प्रकाशित करत आहेत. निरक्षीरविवेकबुद्धी शाबूत ठेवून चांगल्यात चांगली पुस्तके कशी प्रकाशित करता येतील याचा उत्तम वस्तुपाठ घनश्याम पाटील यांनी ‘चपराक प्रकाशन’च्या माध्यमातून घालून दिला आहे असे मत कोथरूडच्या माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने चपराक प्रकाशनने जो साहित्य सप्ताह सुरू केला त्याच्या पहिल्या दिवशी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या ‘अर्धशतकातला अधांतर-इंदिरा ते मोदी’ या पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ, चपराकचे प्रकाशक घनश्याम पाटील, लेखक भाऊ तोरसेकर व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रा. कुलकर्णी म्हणाल्या, समाजाच्या हिताची भूमिका मांडणे हा साहित्यनिर्मितीचा उद्देश असतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा कोणती चांगली पुस्तके घ्यावीशी वाटतात तेव्हा चपराकची आठवण यावी इतकी पुस्तके ते सातत्याने प्रकाशित करत आहेत. भाऊ तोरसेकर यांचं हे पुस्तक राजकीय अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. राजकारण समजून घ्यायचं असेल, आपण योग्य दिशेने जात आहोत की नाही हे माझ्यासारख्या समाजकारणातल्या-राजकारणातल्या व्यक्तिला पडताळून पहायचे असेल तर हे पुस्तक आणि भाऊंचे एकंदरीत लेखन हा महत्त्वाचा पर्याय आहे.
सुधीर गाडगीळ म्हणाले, अतिशय परखड भूमिका, सत्यनिष्ठ मांडणी, कुणाला तरी खूश करायचे म्हणून भूमिका न घेता राजकारणाचा मोठा पट उलगडून दाखवणे हे भाऊंच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. चपराकचीही हीच भूमिका असल्याने हे पुस्तक त्याच भूमिकेचा पुरस्कार करणारे आहे. जर मोदी समजून घ्यायचे असतील तर आधी त्यांना इंदिरा गांधी समजून घ्यायला हव्यात हे सांगणारे हे पुस्तक आहे.

भाऊ तोरसेकर यांनी अनेक खुमासदार किस्से सांगत राजकारणाचा आढावा घेतला. बुद्धिवादी लोकच जास्त शंकेखोर असतात त्यामुळे ते काहीच करू शकत नाहीत. नरेंद्र मोदी हे राजकारण करतात मात्र त्यात त्यांचा स्वतःचा काहीच स्वार्थ नसतो त्यामुळे त्यांनी विजयश्री खेचून आणली. बालिश लोकांच्या नेतृत्वगुणांचा अतिरेकी उदो उदो झाल्याने मोदींनी मुसंडी मारत देशाचे चित्र बदलले असेही त्यांनी सांगितले.
प्रकाशक घनश्याम पाटील यांनी प्रास्ताविक केले. सुप्रसिद्ध कवी माधव गिर यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: