तबला सहवादन आणि पंकज उधास यांच्या गझलांनी रंगला रविवार


पुणे, दि. २१ – यशवंत वैष्णव आणि ईशान घोष यांचे तबलावादन आणि पंकज उधास यांच्या गझलांनी पुणेकरांच्या रविवारची रंगत आज वाढविली.

डाॅ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १४ व्या वसंतोत्सवाच्या तिस-या दिवसाची सुरूवात आज आश्वासक युवा तबलावादक यशवंत वैष्णव आणि ईशान घोष यांच्या एकत्रित  तबलावादनाने झाली. महोत्सवाचा हा तिसरा आणि शेवटचा दिवस होता.यशवंत वैष्णव हे ज्येष्ठ तबला वादक पं. योगेश समसी यांचे शिष्य आहेत तर ईशान घोष हे पं. नयन घोष यांचे पुत्र व शिष्य आहेत. या दोघांनी ताल तीनतालने आपल्या सहवादनाला सुरूवात केली.

पुण्यामध्ये पहिल्यांदाच सहवादन करत आहोत, असे सांगत या दोघांनी संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आणि कोरोनाच्या या परिस्थितीत महोत्सवाला सर्व नियमांचे पालन करित जमलेल्या रसिकांचे आभार मानले. पं. वसंतराव देशपांडे आणि आपले आजोब पं निखिल घोष हे एकत्र  गायन वाद न करत असे लहापणीपासून ऐकत आलो आहे, हे देखील ईशान यांनी आवर्जुन सांगितले.

यानंतर ईशान घोष आणि यशवंत वैष्णव यांनी पं. नयन घोष, उस्ताद अल्लारखा खान, उस्ताद इलमस हुसैन खान, उस्ताद अमीर खान साहेब, पं. अनोखेलाल मिश्र, पं. सुशीलकुमार जैन, उस्ताद शेरखान साहेब, पं. योगेश समसी,पं. ज्ञानप्रकाश घोष यांसारख्या अनेक सुप्रसिद्ध तबलावादकांच्या चीजा पेश केल्या. या दोघांच्या उत्फुर्त सहवादन प्रेक्षकांनी देखील मनमुराद आनंद घेतला. त्यांना मिलिंद कुलकर्णी यांनी समर्थ अशी संवादिनीची साथ केली.

यानंतरच्या सत्रात गीतकार नूह नारवी यांची ‘आप जीनके करिब होते है…’ या गझलेने सुप्रसिद्ध गझल गायक पद्मश्री पंकज उधास यांनी आपल्या कार्यक्रमाला सुरूवात केली.  यानंतर त्यांनी त्यांची आवडती कैसर उल जाफरी यांची ‘दीवारों से मिलकर रोना अच्छा लगता है, हम भी पागल हो जायेंगे, ऐसा लगता है…’ ही गझल पेश केली. गझलेची सुरूवात, शेर आणि शेवट कशा पद्धतीने असतो हे देखील त्यांनी आवर्जून सांगितले.

राजेश रेड्डी यांची ‘यहां हर शख़्स हर पल हादसा होने से डरता है खिलौना है जो मिट्टी का फ़ना होने से डरता है…’ ही गझल सादर करीत त्यांनी ती रेकाॅर्डिंग आणि सादरीकरण करतानाचे किस्से देखील त्यांनी सांगितले.’चांदी जैसा रंग है तेरा, सोने जैसे बाल’ आणि ‘चिठ्ठी आई है, आई है, वतन से चिठ्ठी आई है’, ‘निकालो ना बेनकाब’,’और आहिस्ता कीजिये बातें’  या त्यांनी सादर केलेल्या गझलांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले.
त्यांना उस्ताद नासीर अहमद यांनी मॅन्डोलिन, राशिद मुस्तफा थिरकवा यांनी तबला, श्रीनिनाद मुळावकर यांनी बासरी, निर्मलसिंग पवार ढोलक, विशाल धुमाळ यांनी की बोर्ड साथ केली. आशिष चोचले यांनी ध्वनीसंयोजन तर बिमल जोशी यांनी रंगमंच व्यवस्था पाहिली.

Leave a Reply

%d bloggers like this: