तिरंग्याचा अपमान ज्यांनी केला त्यांना पकडा – राकेश टिकैत
नवी दिल्ली – कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, या रॅलीला हिंसक वळण लागून लाल किल्ल्यावरही तणाव निर्माण झाला होता. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं. त्यावरून शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मोदींवर पलटवार केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. नव्या वर्षातील पहिल्या ‘मन की बात’मध्ये मोदींनी देशभरातील वेगवेगळ्या घटनांबद्दल भाष्य केलं. यात भारताने कोरोनाविरोधात दिलेली लढाई जसं जगासमोर एक उदाहरण ठरलं, तसंच आता लसीकरणही ठरतंय, असं मोदी यांनी नमूद केलं. तसेच यावेळी पंतप्रधानांतील प्रजासत्ताक दिनी झालेल्या घटनेबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केलं. प्रजासत्ताक दिनी झालेल्या तिरंग्याच्या अपमानानं देश दुःखी झाला, असं मोदी म्हणाले होते.
पंतप्रधानांच्या या विधानावरून शेतकरी नेते राकेत टिकैत यांनी मोदींवर टीका केली. टिकैत म्हणाले,”सर्व देश तिरंग्यावर प्रेम करतो. ज्याने तिरंग्याचा अपमान केला आहे, त्याला पकडावं,” अशा शब्दात टिकैत यांनी मोदी यांच्यावर पलटवार केला. कृषी कायद्यांवरून शेतकरी व सरकारमध्ये पुन्हा चर्चा करण्याबद्दलही टिकैत यांनी भूमिका मांडली. “बंदूकीचा धाकावर चर्चा करणार नाही,” असं टिकैत म्हणाले.