प्रबोधनकारांची विचारसरणी नवतत्त्वज्ञान मांडणारी – सचिन परब

पुणे : प्रबोधनकार कुठल्याही धर्माच्या विरोधात नव्हते. जाती-जातीतील वाईट चालीरितींना त्यांनी कडाडून विरोध केला. पत्रकाराच्या भूमिकेतून ते समाजातील प्रत्येक घटनेकडे चिकित्सकपणे पाहत होते आणि नवतत्त्वज्ञान मांडत होत, असे प्रतिपादन प्रबोधनकार साहित्य डॉट कॉमचे ज्येष्ठ पत्रकार सचिन परब यांनी केले.

ज्येष्ठ समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या संपादकत्वाखालील ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या शतकोत्सवानिमित्त संवाद पुणेतर्फे प्रबोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात आज ‘प्रबोधनकारांचे हिंदुत्व’ या विषयावर परब यांचे व्याख्यान झाले. त्या प्रसंगी त्यांनी प्रबोधनकारांच्या आयुष्यातील काही ठळक नोंदी पुणेकरांसमोर मांडल्या. प्रा. सुभाष वारे अध्यक्षस्थानी होते. संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, ज्येष्ठ पत्रकार हरिश केंची, चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे आदी उपस्थित होते.

व्याख्यानापूर्वी प्रबोधनकारांच्या ‘शेतकर्‍यांचे स्वराज्य’ पुस्तकातील काही भागाचे अभिवाचन प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले. कामगार आणि शेतकरी यांच्याविषयीचे लेखन आजच्या काळातही किती सुसंगत ठरू शकते हे प्रबोधनकारांच्या साहित्यातून प्रकर्षाने जाणवले.
परब म्हणाले, आज काही लोकांना ठाकरे हवे आहेत तर प्रबोधनकार नको आहेत, काही लोकांना प्रबोधनकार हवे आहेत पण ठाकरे नको आहेत. कारण त्यांचे विचार पचणारेही नाहीत आणि सोयीचेही नाहीत. पण त्यांचे त्या काळातील विचार आजच्या काळाशीही सुसंगत आहेत. प्रबोधनकारांच्या आयुष्यात अनेक प्रलोभनांचे प्रसंग आले. ते गरिबीत राहिले पण त्यांनी व्यक्त होताना कुणाची सोय पाहिली नाही. ते पुढे म्हणाले, प्रबोधनकारांनी धर्माची चिकित्सा केली पण ते स्वत:ला हिंदुत्ववादी मानत. ते कुठल्याही धर्माच्या विरोधात नव्हते, ते समाजाला नवी दृष्टी देत गेले. बहुजन हिंदुत्वाची व्याख्या सांगणारे ते मूळ पुरूष आहेत.

प्रा. वारे म्हणाले, सनातन काळापासून जे जे समोर आले त्यातील चांगलेच प्रबोधनकारांनी स्वीकारले. माणसाला माणूस मानणे आणि त्याला समृद्ध करणे अशी त्यांची विचारधारा होती. प्रबोधनकारांनी मांडलेले विचार प्रत्यक्ष जीवनात कसे उतरणार हा प्रश्न आहे. विषमता आणि अवैज्ञानिक गोष्टी बाजूला सारून प्रबोधनकारांच्या विवेकी परंपरा पुढे नेऊया असे आवाहन त्यांनी केले.
संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाची भूमिका विषद केली. हरिश केंची यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. सूत्रसंचालन निकिता मोघे यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: