नागरिकांची कामे मार्गी लावण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पाठबळ – आबा बागुल
पुणे – शहरातील नागरिकांना छोट्या-छोट्या कामांसाठी वणवण करावी लागत आहे. नागरिकांची ही कामे मार्गी लावण्यासाठी त्या-त्या भागातील काँग्रेस कार्यकर्त्यांना पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्वोतोपरी मदत करू,तसेच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही काँग्रेस पक्षाच्या आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत पुणे महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी दिली.
पुणे शहरात येत्या जानेवारी महिन्यापासून ‘प्रशासन आपल्या दारी’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत काँग्रेस पक्षाचे आजी-माजी नगरसेवक,पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग असणार आहे. नागरिकांचे प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी या मोहिमेत भर दिला जाणार असल्याचे आबा बागुलांनी सांगितले.
पुणे महानगरपालिकेच्या माहे डिसेंबरच्या कार्यपत्रिकेवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस पक्षाने रविवार दिनांक १३/१२/२०२० रोजी बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत शहराच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली असून २०२२च्या महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळून पुन्हा काँग्रेस पक्षाची पुणे महापालिकेवर सत्ता आणण्याचा निर्धार पक्षाच्या आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
बागुल म्हणाले की, पुणे शहराची वाहतूक कोंडी सोडवायची असेल तर एचसीएमटीआर रस्ता होण्यासाठी काँग्रेस पक्ष पाठपुरावा करून नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करेल. मुंबई व नागपूर येथे मेट्रो प्रकल्प होत असताना तेथील महानगरपालिकेकडून हिस्सा घेण्यात आला नाही. मग पुणे शहरात मेट्रो प्रकल्प करत असताना पुणे महानगरपालिकेला १० टक्के हिस्सा देण्याची अट घालून पुणेकरांवर बोजा टाकण्याचा घाट काँग्रेस पक्ष होऊ देणार नाही,काँग्रेसच्या काळात पीएमटी सक्षम होती परंतु आता पीएमपीएमएल अस्तित्वात असताना अंदाजे १९०० कोटी रुपयांची तूट महापालिकेकडून देण्यात येते. त्यात पुणे शहरात मेट्रो सुरु झाल्यावर पीएमपीएमएलचे काय होणार हा मोठा प्रश्न आहे. काँग्रेसने शहरातील नळ कोंडाळे बंद करून नागरिकांना घरोघरी नळ दिले परंतु सत्ताधारी भाजपने २४x७ योजनेचा घाट घालून पुणेकरांना वेठीस धरले आहे. भविष्यात मिळकतकर कमी परंतु पाणीपट्टी जास्त अशी वेळ येईल. काँग्रेस पक्ष असे कदापि होऊ देणार नाही. रस्तारुंदीकरण, ई बाईक, अमेनिटी स्पेस, झोपडपट्टी पुनर्वसनासाठी इंदिरा संजीवनी योजना, अश्या अनेक मुद्द्यावर चर्चा करण्यात आली.
यावेळी उल्हास पवार म्हणाले की, पक्षाचे काम एक निष्ठेने केले पाहिजे पद मिळणे हा नशिबाचा भाग आहे. मी अनेकांना शहर अध्यक्ष केले ते मंत्री,खासदार,आमदार झाले. पक्षाचे काम करा पदे मिळत असतात. आपण नगरसेवक होणारच आहोत असे गृहीत धरून जोमाने कामाला लागा.
डॉ सतीश देसाई म्हणाले की, काँग्रेसचा कार्यकर्ता तळागाळापर्यंत पोहचवण्याची आबा बागुलांनी केलेली ही धडपड नक्कीच फळाला येईल व येत्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण चांगल्याप्रकारे नियोजन करून पक्षाची ताकद वाढेल.
श्रीकांत शिरोळे म्हणाले की, सत्ताधारी भाजप नियमांची पायमल्ली करत असून स्वीकृत सभासदाला दिलेले सभागृहनेते पद हे त्याचे उदाहरण आहे. हे घटनात्मक पद असून चार दिवसांच्यावर त्यांच्याकडे या पदाचीजबाबदारी राहणार नाही.येणारा काळ ते दाखवील.
अभय छाजेड म्हणाले की, ईव्हीएम मशीनमध्ये घोळ आहे. राज्य सरकारला महापालिकेच्या निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याचे अधिकार असून त्यासंदर्भात राज्य सरकारशी चर्चा करू.
यावेळी शांतीलाल सुरतवाला,कमलताई व्यवहारे,श्रीकांत शिरोळे, दीप्ती चवधरी, सुधीर काळे,विद्या भोकरे, रजनी त्रिभुवन, मुख्तार शेख,लताताई राजगुरु, सुजाता शेट्टी, वैशाली मराठे,चंदू कदम, रफिक शेख, काका धर्मावत, सोनाली मारणे, भीमराव पाटोळे, द.स.पोळेकर,रमेश सोनकांबळे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
