संजीवन समाधी सोहळा आता ‘विश्वशांती दिवस’; डॉ. विश्वनाथ कराड यांची घोषणा
पुणे – तत्वज्ञ संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या 724 व्या संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून कार्तिक वद्य त्रयोदशी, म्हणजेच 13 डिसेंबर 2020 पासून संपूर्ण जगभर हा दिवस ‘विश्वशांती दिवस’ म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी केली.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि श्री क्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समितीच्या वतीने तत्त्वज्ञ संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या 724 व्या संजीवन समाधी सोहळा श्री. विश्वदर्शन देवता मानवता मंदिर, विश्वराजबाग, लोणी काळभोर येथे संपन्न झाला.
यावेळी रामेश्वरम्चे ट्रस्टी व विद्याउपासक स्वामी राधाकृष्ण गंगाधर दशपुत्रे, अक्कलकोट स्वामी संस्थानचे प्रमुख पुजारी पवन गुरूजी, इस्लामचे गाढे अभ्यासक डॉ. रफीक सय्यद, कृषीतज्ञ प्रा.डॉ. मुकुंद गायकवाड, सुप्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये व नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण हे उपस्थित होते.
तसेच,माईर्स एमआयटीचे कार्यकारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त प्रा.राहुल विश्वनाथ कराड, माईर्स एमआयटीचे अध्यक्ष व विश्वस्त डॉ. मंगेश तु. कराड, सह कार्यकारी विश्वस्त डॉ.सुचित्रा कराड-नागरे, महासचिव स्वाती कराड-चाटे, उपाध्यक्ष व विश्वस्त ज्योती कराड-ढाकणे, कवयित्री सौ. उर्मिला विश्वनाथ कराड, सौ. उषा विश्वनाथ कराड, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे आणि पंढरपूरचे श्री.दत्तात्रय बडवे हे उपस्थित होते.
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“संत ज्ञानेश्वर महाराजांनी जे गुह्य सांगितले आहे. त्या मार्गावर समाज चालला तर तो सुखी होईल. 724 वर्षापूर्वी त्यांनी सुख, शांती आणि समाधानाचा मार्ग दाखविला आहे. निसर्गाने कोरोनाच्या रूपात संपूर्ण जगाला दिलेली ही धोक्याची घंटा आहे. अशा वेळी साधू, संत आणि महात्म्यांनी दिलेल्या संदेशाचे अनुकरण केल्यास मानवजातीचे कल्याण निश्चित होईल.”
“724 वर्षापूर्वी तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊलींनी 21 व्या वर्षी संजीवन समाधी घेतली, ज्ञात इतिहासामध्ये, ‘वयाच्या 21 व्या वर्षी संजीवन समाधी’ घेण्याचे हे एकमेव उदाहरण म्हणता येईंल. सहिष्णुता आणि मानवतेचे मूर्तिमंत प्रतीक म्हणून संत ज्ञानेश्वरांना ओळखले जाते. विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय साधण्याचा प्रयत्न संत ज्ञानेश्वरांनी आपला ग्रंथ ‘ज्ञानेश्वरीच्या’माध्यमातून केला. पुढे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. अल्बर्ट आईन्स्टाइन यांनी, तत्त्वज्ञ संत ज्ञानेश्वरांच्या सिद्धांताना दुजोरा देणारे संशोधन केले.”
विश्व शांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी, पुणे आणि श्री क्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समिती यांच्या वतीने श्री क्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या तीरावर उभारण्यात आलेल्या विश्वरूप दर्शन मंचावर जागतिक सहिष्णुता सप्ताह व ज्ञानेश्वर माऊलीचा संजीवन समाधी सोहळा गेल्या 20 वर्षांपासून आयोजित केला जात आहे. यावर्षी कोरोनाच्या कारणास्तव हा सोहळा त्या ठिकाणी होऊ शकला नाही. परंतू कार्तिक वद्य त्रयोदशी हा दिवस संपूर्ण जगात विश्व शांती दिवस म्हणून साजरा केला जाईल. ही घटना संपूर्ण मानवी इतिहासात प्रथमच घडली आहे. ‘21 व्या शतकात संपूर्ण जगात भारत विश्वगुरू म्हणून उदयास येईल आणि संपूर्ण जगाला सुख, समाधान आणि शांतीचा संदेश देईल’, या स्वामीजींनी सांगितलेल्या भाकिताची ही सुरूवातच आहे.
डॉ. रफीक सय्यद म्हणाले,“वर्तमान काळात सृष्टीवरील प्रत्येक व्यक्ती ही भाऊ-बहिण आहे हे नाते विसरले गेले आहे. त्यामुळेच 700 वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वरांनी ‘हे विश्वची माझे घर’ हा संदेश देऊन सर्वांना सुखी होण्याचा मार्ग दाखविला. त्यांनी प्रत्येकांच्या जीवनात प्रकाश आणण्याचा प्रयत्न केला. या पृथ्वीतलावर विज्ञानाने समाजाला भौतिक सुख मिळेल. पण मानवाचे भले हे ईश्वराच्या चरणी गेल्यावरच होईल. आपल्या संतांनी जीवन जगण्याचा जो सार्थक संदेश दिला आहे. तोच संदेश आज डॉ. विश्वनाथ कराड देऊन माणसे जोडण्याचे अद्वितिय असे कार्य करीत आहेत.”
डॉ. संजय उपाध्ये म्हणाले,“रामेश्वरम्, अक्कलकोट आणि राजबाग लोणी यांचा त्रिवेणी संगम या ठिकाणी घडलेला आहे. तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली यांचा संजीवन समाधी सोहळा हा दिवस संपूर्ण जगात विश्व शांती दिवस म्हणून साजरा करावा असे जाहीर केले गेले आहे. कोणत्याही कामात सातत्य, त्यात तपश्चर्या केल्या नंतरच यश मिळते याची प्रचीती येथे येत आहे. मानवाच्या मनात आधुनिकता हवीच पण तसेच चांगल्या विचारांची धुनी असली तर चित्त चांगले राहते. तसेच, ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेला करूणेचा संदेश हा जगाला तारू शकेल.”
स्वामी राधाकृष्ण गंगाधर दशपुत्रे यांनी समारंभाला आशिर्वाद देऊन रामेश्वर येथील प्रसाद दिला. विश्वशांती व कल्याणाची कामना केली. सौ. उर्मिला विश्वनाथ कराड व डॉ. मुकुंदराव गायकवाड यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनातील विविध प्रसंगाचा संदर्भ देऊन आजच्या काळात मानवाने कसे जीवन जगावे हे सांगितले.
ह.भ.प. डॉ. सुदाम महाराज पानेगांवकर यांनी काल्याचे कीर्तन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळाही संपन्न झाला. ह.भ.प.श्री. रामचंद्र महाराज इंगोले, महेश महाराज नलावडे आणि शालिकराम महाराज खंदारे यांची कीर्तने झाली.
