कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वैयक्तिक पातळीवर काळजी महत्त्वाची – डॉ.अविनाश भोंडवे
पुणे : यावर्षीची सुरुवात कोरोनाने झाली. कोरोना इतक्या प्रमाणात वाढेल असे वाटले नव्हते. आठ महिन्यात देखील यावर कोणतेही औषध आलेले नाही. सरकारने जाहीर केलेले औषध आजपासून ७३ दिवसांनी देणार आहेत. आपल्यापर्यंत औषध येण्यासाठी अजून वर्ष लागेल. पण कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे मत इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले.
इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र, रोटरी क्लब आॅफ पाषाण, अखिल मंडई मंडळ आणि पी.पी. ग्रुपच्या वतीने कोरोनावरील प्रतिबंधात्मक उपायांबाबत जनजागृती करण्यासाठी माहितीपटाचे वितरण पेन ड्राईव्हच्या माध्यमातून अखिल मंडई मंडळाच्या समाजमंदिरात करण्यात आले. यावेळी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, रोटरी क्लब आॅफ पाषाणचे अध्यक्ष विजय रेखी, अॅड. प्रताप परदेशी, संजय मते, प्राजक्ता जेरे, प्रदीप मुळे,उल्हास पाठक उपस्थित होते. विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.
डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, कोरोनाचा संसर्ग वाढण्याचे कारण प्रतिबंधात्मक उपाय लोकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचले नाहीत. कोरोनापासून दूर राहण्यासाठी हात धुणे, मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवणे या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. परंतु या तीन गोष्टीतील बारकावे काय आहेत,हे माहितीपटात सांगण्यात आले आहेत.
अण्णा थोरात म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करण्याची गरज आहे. गणेशोत्सव मंडळांनी साधेपणाने उत्सव साजरा करणे ही काळाची गरज होती. कोरोनावरील प्रतिबंधक उपायांचा माहितीपट दाखविल्याने लोकांमध्ये जनजागृती होऊन कोरोनाचा संसर्ग कमी होण्यास मदत होईल असेही त्यांनी सांगितले.
विजय रेखी म्हणाले, कोरोनावरील प्रतिबंधक माहितीपट हा शास्त्रीय दृष्टीकोनातून तयार करण्यात आला आहे. यात अनेक बारकावे सांगण्यात आले आहेत, ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो. पुणे शहरातील जास्तीत जास्त गणेशमंडळांना हा माहितीपट देण्यात येणार आहे. जेणेकरुन गणेश मंडळात हा माहितीपट दाखविला जाईल.
