व्यक्तिचित्रण लेखन म्हणजे त्या व्यक्तिमत्वांचे सप्तरंगी आरेखन असते – डाॅ. अश्र्विनी धोंगडे
पुणेः- व्यक्तीचित्रण लिहणे ही तारेवरची कसरत असते. तुम्ही ज्या व्यक्ती विषयी लिहत असतात त्याला तुम्ही खूप जवळून ओळखत असतात. म्हणजेच लेखक त्या व्यक्तीला त्याच्या गुणदोषांसह ओळखत असतो. व्यक्तिचित्रण लिहितांना त्याच्यातील गुणांवर प्रकाश टाकातांना दोषांवरही लेखक लिहीत असतो, परंतू दोषांबाबत लिहितांना त्याच्यातील दोषाना द्वेषाने न पाहता, त्या व्यक्तिमत्वावर डाग पडणार नाही अशा पद्धतीने ते लिहिले जात असते. व्यक्तिचित्रण लेखन म्हणजे त्या त्या व्यक्तिमत्वांचे केलेले सप्तरंगी आरेखन असते, असे मत ज्येष्ठ स्त्रीवादी लेखीका आणि समिक्षक डाॅ. अश्र्विनी धोंगडे यांनी व्यक्त केले.

दिलीपराज प्रकाशन आणि आडकर फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिलीपराज प्रकाशन प्रकाशीत आणि अखिल भारतीय मराठी प्रकाश संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे लिखीत ‘मनातील माणसं’ या व्यक्तिचित्रण संग्रहाचे प्रकाशन डाॅ. अश्र्विनी धोंगडे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर आडकर फौंडेशनचे प्रमुख अॅड. प्रमोद आडकर, लेखक राजीव बर्वे, लेखक प्रा. मिलिंद जोशी आणि मधुमिता बर्वे उपस्थित होते.
डाॅ. अश्र्विनी धोंगडे म्हणाल्या की, मराठी साहित्यात व्यक्तिचित्रणाची मोठी थोर परंपरा आहे. व्यक्तिचित्रण म्हणजे त्या व्यक्तीचे चरित्र नसून ते त्याचे चित्र असते. ते अतिशय थोडक्यात मांडलेले असते. स्लाईस आॅफ लाईफ या तत्वाने व्यक्तिचित्रणाचे रेखाटन केलेले असते. व्यक्तचित्रण म्हणजे त्या त्या व्यक्तीच्या जीवनाच्या अवकाशाचा सार, सारांश असतो. व्यक्तिचित्रण लेखन हा प्रभावी साहित्य प्रकार आहे. एखाद्या व्यक्तिमत्वाचा आढावा घेताना घेतल्या जाणा-या चित्रकलेपेक्षा हे प्रभावी माध्यम आहे. कारण चित्रांत रंगाचे, समजुतीचे तत्सम अडथळे येण्याची शक्तता असते. व्यक्तिचित्रण साहित्य मात्र अशा अडथळ्यांवर स्वार होते. हा साहित्य प्रकार म्हणजे या ह्दयीचे त्या ह्दयी असा प्रवास असतो. व्यक्तिचित्रण साहित्य प्रकारात व्यक्तिमत्वाच्या अंतरंगाचे नव्हे तर अंतःरुपाचे चित्रण असते. मुळात व्यक्तिचित्रण या साहित्यप्रकाारची खोलीच खुप आहे.
गॅल्मरस चेह-यांमागील माणूस दाखिविण्याचा या पुस्तकांतून प्रत्यत्न करण्यात आला आहे. माणूस वाचणे तसे कठीण काम अाहे. जोवर तुम्ही त्या व्यक्तिमत्वाच्या भावभावनांशी उत्कटपणे जोडले जात नाहीत, तोवर ती व्यक्ती ओळखली जाणे कठीण असते.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, लेखक राजीव बर्वे यांनी मळलेल्या वाटेवर न चालता नवनव्या वाटांचा शोध घेतला. त्या वाटेवर चालतांना त्यांच्या पायाखाली जशी फुले अाली तशी काटे देखील आले. मुळात माणूस हा गुणदोषांचा संयोग असतो. व्यक्तिचित्रण हे त्या व्यक्तिचे चरित्र नसते, आत्मचरित्र नसते तर त्याच्यातील माणूसपणाचा घेतलेला शोध असतो. या पुस्तकात लेखकाने रेखाटलेली व्यक्तिचित्रणे ही भावस्पर्शी आहेत. जगात वावरतांना माणसांतील न्युनतम शोधणे सोपे असते, पंरतू त्या सर्वसामान्या व्यक्तिमत्वातील दिव्यत्व शोधून ते लिहणे कठीण असते. बर्वे यांनी ही तारेवरची कसरत लिलया सांभाळली आहे. दगडाचा नकोसा असलेला भाग काढून टाकला की जसे त्या दगडाचे मुर्तीत रुपांतर होते त्या शैलीत हे पुस्तक उतरलेले आहे. सामान्य माणसांतील असामान्यत्व लेखकाने शोधले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आडकर फौंडेशनचे संस्थापक- अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर यांनी केले, तर दिलीपराज प्रकाशनाचे मधुर बर्वे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करून उपस्थितांचे अभार मानले.
