जैन समाजाकडून राज ठाकरेंची भेट; शिवरायांच्या जिरेटोप प्रकरणी लेखी माफीनामा
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याच्या वादग्रस्त घटनेनंतर मालाड येथील जैन समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी समाजाच्या वतीने घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत राज ठाकरे यांना लेखी माफीनामा सादर करण्यात आला.
शिष्टमंडळाने या घटनेमागे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचे स्पष्ट केले. भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडणार नाही, तसेच सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
यावेळी राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा आदर राखण्याची गरज अधोरेखित करत, मुंबईत काही ठिकाणी मराठी फलकांवर पांढरे पट्टे मारण्याच्या प्रकारांवर नाराजी व्यक्त केली. अशा घटनांमुळे मराठी आणि जैन समाजात विनाकारण तणाव निर्माण होत असून तो तातडीने थांबला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रभावाखाली न जाता धर्माचे कार्य धर्मापुरतेच मर्यादित ठेवावे, असा सल्ला त्यांनी जैन समाजाच्या प्रतिनिधींना दिला. जैन समाजाशी आपले नेहमीच स्नेहपूर्ण संबंध राहिले असून समाजातील लोकांनी अफवांना बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
या भेटीनंतर मालाडमधील वाद शांततेच्या मार्गाने मिटल्याचे चित्र असून, मराठी अस्मिता आणि सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश या बैठकीतून देण्यात आला.
