Friday, June 19, 2026
BLOG

‘लोकमान्य आणि मराठी भाषा’

भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दीच्या सांगते निमित्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे आयोजित’ युगपुरुष ‘ या कार्यक्रमात प्रसिद्ध लेखक, वक्ते आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांचे’लोकमान्य आणि मराठी भाषा’या विषयावर व्याख्यान झाले त्यातील महत्वाचा भाग…

ज्यावेळी भारत निर्धन, नि:शस्त्र, नि:सैनिक आणि परतंत्र होता आणि ब्रिटिशांच्या साम्राज्यावरच्या सूर्य मावळत नव्हता तेव्हा ब्रिटिश साम्राज्यशाहीला जबरदस्त हादरा देणारे आशिया खंडातील पहिले पुढारी म्हणून लोकमान्य टिळकांचा उल्लेख करावा लागेल. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लोकमान्यांचा गौरव करताना म्हटले होते ‘महाराष्ट्राच्या विभूषणाला, आर्यधर्माच्या अभिमानाला, नीतिमत्तेच्या निपुणतेला, स्वदेशप्रीतीच्या उद्भवाला, त्या लोकमान्य बाळगंगाधर टिळकांना त्रिवार वंदन! टिळकांच्या निधनानंतर महात्मा गांधींनी त्यांना श्रद्धांजली वाहताना म्हटले होते ‘A giant among men has fallen. The voice of a lion is hushed. He was the idol the people. His word was law among thousands’ ज्यांचा शब्द हजारो देशवासियांसाठी प्रमाण होता असे टिळकांचे व्यक्तिमत्त्व होते क्रांतिकारकांचे स्फूर्तिदाते असणारे आणि नंतर योगी झालेले अरविंद घोष यांनी टिळकांसंदर्भात म्हटले होते ‘ज्यावेळी जगातल्या साऱ्या शक्ती निष्प्रभ होतात तेव्हा जी शक्ती उभी राहते तिचे नाव लोकमान्य बाळगंगाधर टिळक’ लोकमान्य टिळक हे भारतीय असंतोषाचे जनक होते.

वासुदेव बळवंत यांच्या व्यायाम शाळेत तरुण वयात टिळक जात होते. वासुदेव बळवंतांच्यावर खटला चालू असताना तो ऐकण्यासाठी टिळक आणि आगरकर जात . वासुदेव बळवंत या देशभक्ताला यश मिळाले नाही कारण या देशभक्ताच्या पाठीशी लोक नावाची शक्ती उभी राहिली नाही असे टिळकांना वाटत होते. टिळक आगरकरांना म्हणाले, ‘लोकांना जागे करण्याचा उद्योग केला पाहिजे. जोपर्यंत लोकशक्ती जागृत होत नाही. तोपर्यंत क्रांतिकारकांच्या बलिदानाने प्रश्न सुटणार नाहीत. विचारांचे बंड निर्माण केले पाहिजे. राष्ट्राभिमान जागविणाऱ्या शिक्षणाच्या माध्यमातून हे बंड निर्माण करता येईल. मालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर नवीन शाळा काढण्याच्या तयारीत होते. टिळक आणि आगरकर त्यांना जाऊन मिळाले. १ जानेवारी १८८० रोजी ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना झाली. त्याच्या पाठोपाठ आर्यभूषण नावाचा छापखाना काढण्याचे ठरले. टिळकांच्या मनात विचार आला. शाळेत एक विशिष्ट वयोगटातलेच विद्यार्थी येऊ शकतील पण असा एक मोठा वर्ग आहे जो वयामुळे, व्यापामुळे आणि गावी शाळा नसल्यामुळे शिक्षण घेऊ शकणार नाही. त्यांच्यासाठी एखादी बिनभिंतीची शाळा काढली पाहिजे. लोकशिक्षण, लोकजागरण आणि लोकसंस्करण केले पाहिजे. वृत्तविद्येची पहाट फटफटल्याशिवाय लोकजीवनात ज्ञानाचा अरुणोदय घडणार नाही. त्यासाठी त्यांनी ‘केसरी’ हे मराठी वृत्तपत्र आणि मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र सुरु केले. ब्रिटिश राजवटीचे स्वरूप लोकांना समजावून सांगणे, त्या राजवटीबद्दल असंतोष निर्माण करणे आणि स्वातंत्र्यप्राप्तीसाठी त्याग करायला देशबांधवांना तयार करणे हा त्यांचा हेतू होता.

एकीकडे अग्रलेखातून स्वातंत्र्यासाठी लोकजागरण करणाऱ्या लोकमान्यांनी मराठी भाषेचा विकास, व्याकरण, वापर, राजदरबारी असलेले तिचे महत्त्व असे अनेक विषय अग्रलेखातून हाताळले.त्या विषयी डॉ विश्वास मेहेंदळे यांनी अग्रलेखकार लोकमान्य टिळक या पुस्तकात अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे टिळकांनी मराठी भाषेसंदर्भात दै केसरीत नऊ अग्रलेख लिहिले. ‘मराठी भाषेची लेखनपद्धती’ या पहिल्याच अग्रलेखात लोकमान्य लिहितात, ‘इंग्रजांचे आमच्यावर राज्य झाले म्हणून ते आमच्या भाषेतील ह्रस्व, दीर्घ, काना-मात्रा-वेलांट्यावर झालेच पाहिजे असा कायदा नाही. काही लोक सरकारचे साहाय्य घेऊन आपल्या मताचा शिरजोरपणा भाषेवर चालवू पाहणार असतील तर आम्ही ते कदापिही खपवून घेणार नाही.

साने, गोडबोले, हातवळणे यांनी ‘मराठी भाषेची लेखनपद्धती’ हा जो ग्रंथ लिहिला त्याच्या प्रकाशनाच्या निमित्ताने लिहिलेल्या अग्रलेखात लोकमान्य सांगतात ‘ज्याप्रमाणे उच्चार करायचा त्याप्रमाणे शब्द लिहायचा ठरवले तर अनागोंदी होईल. उच्चार प्रमाण धरायचा तो कोणाचा ? सुशिक्षित वर्गाचा की अशिक्षित वर्गाचा? सुशिक्षित वर्गाचा म्हटले तर भाषा बोलण्याचा अधिकार त्यांनाच आहे अशिक्षितास नाही असे म्हणता येणार नाही. सुशिक्षित वर्गात तरी बोलण्याची पद्धत एक कुठे आहे? कोकण, देश, वर्हाड, खानदेश, मराठवाडा उच्चाराच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. जीभेपेक्षा लेखणी जात्याच स्थिर असल्यामुळे एखाद्या भाषेतील लेखनपद्धतीत जितके स्थैर्य असते तितके उच्चार पद्धतीत असत नाही. म्हणून सर्व भाषा लेखन पद्धतीस महत्व देतात. प्रांतोप्रांती उच्चाराचा भेद असतो. एवढीच या प्रकारच्या लेखन पद्धतीची अडचण नाही. मुखाने जितके शब्द उच्चारले जातात ते लिहिण्यासाठी अक्षरसामग्रीही हवी’ बोली भाषा आणि प्रमाण भाषा लेखनपद्धतीला केंद्रस्थानी ठेवून लोकमान्यांनी केलेले विवेचन किती सडेतोड होते याची आपल्याला साक्ष पटते.

भाषा केवळ संवादाचे माध्यम नसते ती लोकशक्तीचा श्वास असते ती भाषा बोलणाऱ्या लोकांचाच त्या भाषेवर अधिकार असतो हे विशद करताना लोकमान्य सांगतात, ‘वैयाकरणी हे भाषेचे शास्ते खरे पण त्यांचा अधिकार देखील मर्यादित आहे. कोणतीही भाषा बोलणारे लोक हेच त्या भाषेचे कर्ते असतात असे असले तरी त्यांना व्याकरणशास्त्र किंवा व्युत्पत्तीशास्त्र झुगारून देता येणार नाही.’ ती भाषा बोलणारे लोक आणि व्याकरणाचे जाणकार या दोघांनीही विचार समन्वयातून मार्ग काढला पाहिजे अशी अपेक्षा ते व्यक्त करतात. मराठी भाषा ही संस्कृतची मुलगी असली तरी तिचे म्हणून एक स्वतंत्र रूप आहे हे आम्हास मान्य आहे असं टिळक सांगतात. मराठीतील कोणती लेखनपद्धती ग्राह्य आणि कोणती अग्राह्य याचा विचार हळूहळू लोकांनीच केला पाहिजे. वैयाकरण्यांनी आपली मते प्रसिद्ध करावीत वादविवाद करावेत. भवति न भवति चर्चा करावी यातून जी संयुक्तिक पद्धत असेल तीच पुढे येईल आणि तिचा प्रघात लोकात पडेल आणि इतर पद्धती लुप्तप्राय होतील.’ असे टिळकांनी सांगितले. ‘मराठी भाषेचा उत्कर्ष’ या शीर्षकाच्या अग्रलेखात लोकमान्य लिहितात, ‘जी मराठी भाषा एकेकाळी महाराष्ट्रातच काय पण कर्नाटक, हैद्राबाद, बडोदा, माळवा, मध्यप्रदेश येथे राज भाषा म्हणून प्रचलित होती. ती आता त्या ठिकाणी हुसकून मराठी प्रांतातही पोरकी होत आहे. ही गोष्ट मराठी भाषेच्या सुपुत्रास अत्यंत लाजिरवाणी आहे.’ लोकमान्यांची स्मृती शताब्दी साजरी होत असताना भाषेच्या या स्थितीत काहीही फरक पडलेला नाही ही खेदाची बाब नाही.

‘मराठी भाषेची वाढ’ या अग्रलेखात लोकमान्य भाषेची महत्ता वाढविण्यासाठी त्या भाषकांच्या हातात सत्ता येणे किती महत्वाचे आहे याची जाणीव करून देताना सांगतात ‘नाडीवरून ज्याप्रमाणे शरीरातील रोगाची अथवा स्वास्थ्याची परीक्षा होते तद्वद भाषेवरून राष्ट्राची बरी वाईट स्थिती तज्ज्ञ लोक ताडतात. छत्रपती शिवाजी महाराज जन्मण्यापूर्वी पोवाडे का झाले नाहीत? हे सांगण्याची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्युदय म्हणजे मराठी भाषेचा अभ्युदय. इंग्रजी भाषा इतर पाश्चत्य भाषात प्रबळ झाली त्याचे मुख्य कारण म्हणजे इंग्रजी साम्राज्य. ती भाषा बोलणारे लोक राज्यकर्ते झाले की लेचीपेची असणाऱ्या भाषेलाही बळ प्राप्त होते. राज्यकर्त्याकडे इच्छाशक्ती असली की भाषेबाबत खूप काही चांगले घडू शकते याची जाणीव ते करून देतात.

भाषेची वाढ होण्यासाठी तिचा दैनंदिन जीवन व्यवहारात अधिकाधिक वापर झाला पाहिजे. भाषा नुसती ओठातून येऊन चालणार नाही ती पोटातून यायला हवी. त्या भाषेत ती भाषा बोलणाऱ्या माणसाचे पोट भरण्याचे सामर्थ्य निर्माण झाले पाहिजे. त्यासाठी ती उद्योगाची भाषा झाली पाहिजे अशी अपेक्षा लोकमान्य व्यक्त करतात.

भाषा आणि संस्कृतीची स्पंदने प्रथम मनात उमटतात आणि नंतर ती उच्चारातून आणि कृतीतून प्रकटतात.आपल्यातली मराठीपणाची ज्योत तेवत ठेवणे महत्वाचे आहे आपले भाषाप्रेम दिखाऊपणासाठी नको. ते आंतरिक जाणिवेतून प्रकट होत राहिले तर भाषा आणि संस्कृती कधीही मरणार नाही. हे लक्षात ठेऊन सर्वजण आपल्या कृतीतून मराठी भाषेवर मनापासून प्रेम करण्यासाठी कटिबद्ध झाले तर ती लोकमान्यांना स्मृती शताब्दीच्या निमित्ताने वाहिलेली खरी आदरांजली ठरेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading