fbpx
Monday, June 17, 2024
PUNE

लो. टिळकांना केवळ गणेश उत्सवाचे आद्यप्रवर्तक या प्रतिमेत अडकवणे चुकीचे – सुबोध भावे,

पुणे, दि. १ – गणेश उत्सवाचे आद्य प्रवर्तक केवळ या प्रतिमेतच आपण लोकमान्यांचे विसर्जन केले. लोकमान्यांचे कर्तृत्व आणि ध्येयवाद यापेक्षा खूप व्यापक होता, तो आपण समजून घेतला तरच आपण लोकमान्यांना ओळखले असे म्हणू शकू असे विचार प्रसिद्ध सिने-नाट्य कलाकार सुबोध भावे यांनी व्यक्त केले.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृती शताब्दी सांगता समारंभानिमित्त आज
संवाद पुणे आणि समर्थ युवा फाैऊडेशन यांच्यासंयुक्त विद्यमाने प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे आणि राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचा खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, त्यावेळी भावे बोलत होते.

यावेळी भाजपा शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सुनिल कांबळे, पुणे मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, समर्थ युवा फाैऊडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, सचिन ईटकर, कीर्तनकार चारुदत्त आफळे आणि संवाद पुणेच्या निकिता मोघे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते

सत्कार सोहळ्यानंतर चित्रपटात साकारलेल्या लोकमान्य या भुमिके विषयी ‘मी आणि लोकमान्य’ या कार्यक्रमाद्वारे अनुभवकथन करतांना भावे म्हणाले की, लोकमान्यांनी केवळ गणेश उत्सवाद्वारे लोकांना एकत्र आणले नाही. त्यांनी अनेक छोट्या कार्यांतून लोकांच्या मनातील स्वांतत्र्य लढ्याबाबतची आग धुमसत ठेवली. लोकमान्य हे ज्योतिष शास्त्राचे गाढे अभ्यासक होते, तसेच ते गणिततज्ज्ञ म्हणून देखील प्रसिद्ध होते. त्यामुळे त्यांच्या मनात स्वातंत्र्य प्राप्तीचा रोड मॅप तयार होता. त्या रोड मॅप नुसारच त्यांची पाऊले उचलली जात होती आणि कोण, कुठे,कोणती भूमिका निभावणार हे त्यांच्या गणीतीय बुद्धित स्पष्ट होते. चित्रपटाच्या निमित्ताने टिळकांच्य चरित्रावर प्रकाशझोत टाकण्यात अशी पुस्तक वाचनात आली. त्यात गंगाधर गाडगीळ यांनी लिहिलेले दुर्दम्य, सदानंद मोरे यांनी लिहिलेले लोकमान्य ते महात्मा हा द्विखंड, न.चिं केळकर यांनी लिहिलेले पुस्तक अशा अनेक पुस्तकांचा माझ्यावर प्रभाव होता. ही पुस्तके वाचून मला उमगले की, शाळेत शिकविले जातात त्यापेक्षा टिळक खुप वेगळे आहेत. टिळकांनी त्यांच्या डोक्यात स्वातंत्र्याचा किल्ला आधीच बांधून ठेवला होता, आणि त्यानुसार त्यांनी सेनापती, सैनिकांची नेमणुकही त्या त्या कामावर आणि ठिकाणावर केलेली होती. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे स्वातंत्र्य प्राप्तीच्या दिशेने उचललेले एक एक पाऊलच होते. पत्नी आणि पुत्राच्या अकाली झालेला वियोगाचे दुःख देखील त्यांना त्यांच्या उद्दिष्ट प्राप्तीच्या ध्येयापासून विचलीत करु शकले नाही. गीता रहस्य लिहण्यामागे देखील टिळकांचा ठाम विचार होता. बेभान होऊन स्वप्न बघा, पंरतू भानावर येऊन ती स्वप्तने सत्यात येण्यासाठी संघर्ष करा हा लोकमान्यांनी तरुणांना दिलेला सर्वात मोठा मूलमंत्र म्हणावा लागेल.

यावेळी खासदार गिरीष बापट, आमदार सुनिल कांबळे, भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, सचिन ईटकर आदी मान्यवरांनी मनोगताद्वारे लोकमान्यांच्या कार्याला उजाळा दिला.

प्रसिद्ध मुलाखतकार आणि सुत्रसंचालक मिलिंद कुलकर्णी यांनी सुबोध भावे यांची प्रकट मुलाखत घेतली.
प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमानंर किर्तनकार चारुदत्त आफळे यांचे ‘लोकमान्यांचे तेजस्वी जीवन’ या विषयावर कीर्तन संपन्न झाले. संवाद पुणेचे सुनिल महाजन यांनी कार्यक्रम आयोजना मागची भूमिका विशद केली तर समर्थ युवा फाैंऊडेशनचे राजेश पांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तिाविक केले. संवाद पुणेच्या निकिता मोघे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading