शहनाझ गिलच्या वडिलांविरोधात तक्रार, बंदूकीचा धाक दाखवून बलात्कार केल्याचा आरोप
बिग बॉस 13 मुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेली शहनाझ गिल सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शहनाझच्या वडिलांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. शहनाझच्या वडिलांच्या विरोधात एका मुलीनं बंदुकीचा धाक दाखवत बलात्कार केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे.

अमर उजालानं दिलेल्या वृत्तानुसार पीडिता जालंधरची राहणारी आहे. शहनाझचे वडील संतोख उर्फ सुक्खा प्रधान यांच्यावर आरोप आहे की त्यांनी 14 मे ला या मुलीला बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला मात्र त्यावेळी तक्रार दाखल करण्याची तिची हिंमत झाली नाही. या मुलीच्या तक्रारीनंतर शहानाझच्या वडिलांवर बलात्काराची केस दाखल करण्यात आली आहे. तपास अधिकारी हरप्रीत कौर यांनी केस दाखल झाल्याची माहिती दिली. त्यांनी सांगितलं, मुलीच्या तक्रारीनुसार 14 मे ला ही मुलगी तिच्या मित्राला भेटण्यासाठी गेली होती. संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ती त्या ठिकाणी पोहोचली तेव्हा संतोख सिंहनं बंदूकीचा धाक दाखवत तिला जबरदस्तीनं कारमध्ये बसवलं आणि तिच्यावर बलात्कार केला. तसेच या मुलीला या बाबत कोणालाही काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती. शहनाझच्या वडीलांविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर ते फरार झाल्याचं बोललं जात आहे. पोलिसांनी अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक केलेली नाही.