हातगाडी, रिक्षाचालक, गॅस डिलिव्हरी देणा-यांना निनादचे कृतज्ञता किट
पुणे : कोरोना संकटामुळे स्वत:चा व्यवसाय हिरावलेल्या हातगाडी, रिक्षाचालकांना व लॉकडाऊनमध्ये सर्वत्र बंद असताना घरापर्यंत जाऊन नागरिकांना गॅस डिलिव्हरी देणा-यांना सदाशिव पेठेतील निनाद पुणे संस्थेने कृतज्ञता किट देऊन सन्मानित केले. तब्बल १८ किलो धान्याचे किट देऊन या कोरोना वॉरिअर्सचे संस्थेने खुन्या मुरलीधर चौकातील अटल कट्टयावर प्रातिनिधीक स्वरुपात आभार मानले.
निनाद पुणे व निनाद नागरी सहकारी पतसंस्थेने जाणिव संघटनेंतर्गत असलेल्या हातगाडी व्यावसायिकांना, गॅस डिलिव्हरी देणा-या कामगार, रिक्षाचालक, भिक्षुकी करणारे, बँडवादक तसेच ग्रामीण भागातील वाडया-वस्तीवरील गरजूंना २०० किट दिले आहेत. प्रातिनिधीक स्वरुपात सदाशिव पेठेमध्ये अटल कट्टयावर काही किट देण्यात आले. यावेळी विश्रामबागवाडा पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा, पेरुगेट पोलीस स्टेशनचे श्रीधर पांडे, निनाद पुणेचे अध्यक्ष उदय जोशी, अनिल गानू, किशोर खैराटकर, रामलिंग शिवणगे, माजी नगरसेविका शुभदा जोशी, अॅड.वैजनाथ विंचूरकर, सतिश गांधी, जाणिव संघटनेचे संजय शंके, चंद्रकांत दाभेकर, श्रीकृष्ण पाटील, सचिन गायकवाड, अशोक कुलकर्णी आदी उपस्थित होते.
दादासाहेब चुडाप्पा म्हणाले, कोरोनाचे संकट लगेच संपणारे नाही, त्यामुळे आपण प्रत्येकाने शासनाने घालून दिलेले नियम पाळणे गरजेचे आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क व ग्लोव्हज्चा वापर नागरिकांनी करणे अत्यावश्यक आहे. यामुळे आपण स्वत:ची व आपल्या आजूबाजूच्या नागरिकांची काळजी घेऊ शकतो. प्रशासन, पोलीस व कार्यकर्ते आपापल्या परीने मदतकार्य करीत आहेत, मात्र आपणही सजगतेने संकटाविरुद्ध स्वयंशिस्त पाळून लढा द्यायला हवा.
उदय जोशी म्हणाले, लॉकडाऊनच्या दोन महिन्यांच्या कालावधीत हातावर पोट असलेल्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाऊन हळूहळू शिथील होत असता, तरीही लगेच हातगाडी चालक व कामगारांना काम मिळेल, याची शाश्वती नाही. त्यामुळे निनाद तर्फे हा पुढाकार घेण्यात आला आहे. या किटमध्ये तूरडाळ, मूगडाळ, मसूरडाळ, तेल, साखर, चहा, मसाला, मिरची, हळद, गव्हाचे पीठ, तांदूळ, पोहे, मीठ, साबण असे सुमारे १८ किलोचे साहित्य देण्यात आले आहे.
