fbpx
Thursday, September 28, 2023
MAHARASHTRAPUNE

आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि आदित्य ठाकरे यांच्यात रंगले ‘ट्विटर वॉर’

परदेशात अडकलेल्या मराठी माणसांना मायदेशात परत आणण्याचा मुद्दा

पुणे : माजी खासदार निलेश राणे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यातील ट्विटर वॉर नुकतेच रंगले आणि त्या पाठोपाठ पुण्यातील भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यातील ट्विटर वॉरही महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय झाला आहे. परदेशात अडकलेल्या मराठी माणसांना मायदेशात परत आणणे हा मुद्दा त्यासाठी निमित्त  झाला. 
सध्या सभा, बैठका यांना बंदी आहे. पण, ट्विटरद्वारे आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत आणि त्यातून राजकारणात रंग भरला आहे. परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांसाठी परराष्ट्र मंत्रालय, नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि एअर इंडिया यांनी तातडीने मदत करावी, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले. 
त्याला रिट्विट करताना सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीत  संवादाचा पूर्णपणे अभाव आहे का? केंद्र सरकार, परराष्ट्र मंत्रालय वंदे भारत मोहिमेसाठी सक्रियपणे पावले उचलत आहेत. मात्र, महाराष्ट्र सरकारच्या काही विभागांकडून परवानगी देण्यास विलंब होत आहे. इतर राज्ये त्यांच्या नागरिकांना परत आणण्यासाठी प्रयत्न करीत असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाने केवळ एका विमानाला परवानगी दिली. महाराष्ट्र सरकारच्या संथ आणि धरसोड वृत्तीच्या धोरणामुळे राज्यातील एक हजार नागरिकांना मायदेशी जाण्याची वाट पहात तेथे अडकून पडावे लागले आहे.
शिरोळे यांच्या ट्विटला आदित्य ठाकरे यांनी परत ट्विट करून उत्तर दिले. ठाकरे यांनी त्यात म्हटले, तुम्ही नवीन आणि तरुण असल्याने इतर ट्रोल आर्मी पेक्षा वेगळे असाल असे वाटले होते. सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात दोषारोप करण्यावर तुमचा भर नसेल असे वाटते. परराष्ट्र मंत्रालय आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालय यांच्या संपर्कात आम्ही आहोत. राजकारण करण्याची ही वेळ नाही. केंद्र्र सरकारच्या मंत्रालयांशी आम्ही समन्वय ठेवून आहोत. एकमेकांकडे बोटे दाखवून काही साधणार नाही. त्याऐवजी विमान उड्डाणांच्या नियोजनात लक्ष देवून तिकिटांसह इतर समस्यांबाबत मदत करण्यासाठी पुढाकार घ्या.
आदित्य ठाकरे यांच्या या ट्विटला शिरोळे यांनी जोरदार उत्तर दिले. त्यात त्यांनी म्हटले की, मी काही ट्रोलर नाही. मी लोकनियुक्त प्रतिनिधी आहे आणि मला, सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. चुकीची टाकलेली पावले आणि संवादाचा अभाव याबद्दल मी राज्य सरकारलाच जबाबदार धरतो. 
दरम्यान, मुंबई मध्ये विमानाच्या लँडिंग ला राज्य सरकारने परवानगी न दिल्याने विविध देशात अडकून पडलेली महाराष्ट्रातील मंडळी मायदेशी परतू शकत नाहीत. अन्य राज्य सरकारे मात्र त्यांच्या राज्यातील नागरिकांना परवानगी देत आहेत असे ट्विट माजी मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनी केले आणि ट्विटर वॉरमध्ये सिद्धार्थ शिरोळे यांची बाजू भक्कम केली.

Leave a Reply

%d bloggers like this: