Tuesday, September 29, 2026
Latest NewsPUNE

पद्मश्री डॉ. कोल्हे दाम्पत्याकडून दुधभाते नेत्रालयाच्या आधुनिक नेत्रसेवेचे कौतुक

पुणे: पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांनी डॉ. दुधभाते नेत्रालय व रेटिना सेंटरला सदिच्छा भेट देत नेत्रालयातील अत्याधुनिक तपासणी व उपचार सुविधांची माहिती घेतली. ग्रामीण व गरजू नागरिकांपर्यंत नेत्रसेवा पोहोचविण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या ‘फिरता नेत्र दवाखाना’ (मोबाईल आय क्लिनिक) उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले.

या भेटीदरम्यान डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे यांची आधुनिक उपकरणांच्या साहाय्याने सविस्तर नेत्रतपासणी करण्यात आली. तपासणीसाठी वापरले जाणारे अद्ययावत तंत्रज्ञान, उपचारपद्धती तसेच रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांची त्यांनी माहिती घेतली. नेत्रालयातील विविध विभाग, वैद्यकीय उपकरणे, स्वच्छता व्यवस्था आणि रुग्णसेवेची कार्यपद्धतीचीही त्यांनी पाहणी केली.

नेत्रालयाचे संचालक व प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. अनिल दुधभाते यांनी कोल्हे दाम्पत्याचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच डोळ्यांचे आरोग्य आणि विविध नेत्रविकारांविषयी माहिती देणारे त्यांचे स्वलिखित ‘नेत्रकोष’ हे पुस्तक त्यांना भेट दिले.

डॉ. दुधभाते नेत्रालयाच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून ‘फिरता नेत्र दवाखाना’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून आतापर्यंत एक हजारांहून अधिक मोफत नेत्रतपासणी शिबिरे घेण्यात आली असून, ग्रामीण भागातील दहा हजारांहून अधिक शालेय विद्यार्थ्यांची मोफत नेत्रतपासणी करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत नेत्रआरोग्य सेवा पोहोचविणाऱ्या या उपक्रमाबद्दल कोल्हे दाम्पत्याने समाधान व्यक्त केले.

“वाढती लोकसंख्या आणि प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर नेत्ररुग्णांना तपासणीपासून उपचारांपर्यंतच्या आधुनिक सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणे आवश्यक आहे. डॉ. दुधभाते नेत्रालयात अशा स्वरूपाच्या सर्वसमावेशक सुविधा उपलब्ध आहेत,” असे डॉ. रवींद्र कोल्हे यांनी सांगितले.

डॉ. स्मिता कोल्हे यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबत रुग्णकेंद्रित दृष्टिकोनही तितकाच महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. डॉ. अनिल दुधभाते यांच्या वैद्यकीय व सामाजिक कार्याबरोबरच नेत्रालयाच्या व्यवस्थापनाचेही त्यांनी कौतुक केले. डॉक्टर आणि कर्मचारी रुग्णांशी आपुलकीने व संवेदनशीलतेने संवाद साधत असल्याचे त्यांनी नमूद केले.

आरोग्यसेवा आणि सामाजिक कार्याला आयुष्य समर्पित केलेल्या कोल्हे दाम्पत्याची भेट आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या शब्दांमुळे ग्रामीण व गरजू घटकांपर्यंत नेत्रसेवा अधिक व्यापकपणे पोहोचविण्याची प्रेरणा मिळाली,” असे डॉ. अनिल दुधभाते यांनी सांगितले.

यावेळी साहित्यिक गिरीश वसेकर, नितीन पाटील, राजेंद्र शेळके, शीतल हिराळकर आणि अंकुर दुबे उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading