Saturday, September 26, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पर्लकोटा नदीला पूर; भामरागडमधील ६३ गावांचा संपर्क तुटला, दोन रुग्णांना एसडीआरएफची मदत

गडचिरोली : गडचिरोलीसह लगतच्या छत्तीसगडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. भामरागड परिसरातील पर्लकोटा नदीला पूर आल्याने नदीचे पाणी जुन्या पुलावरून वाहू लागले असून, भामरागडचा जिल्ह्यातील अन्य भागांशी संपर्क तुटला आहे. परिणामी भामरागड–आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

पुलावरून पाणी वाहत असल्याने भामरागड तालुक्यातील सुमारे ६३ गावांचा संपर्क बाधित झाला आहे. पर्लकोटासह इंद्रावती आणि पामुलगौतम नदी-नाल्यांच्या पाणीपातळीतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक, वीजपुरवठा, मोबाईल सेवा तसेच दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झाला आहे.

दरम्यान, पूरस्थितीत वैद्यकीय मदतीची गरज असलेल्या भामरागडमधील दोन गंभीर रुग्णांना राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) पथकाने सुरक्षितपणे बाहेर काढले. पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे रस्तामार्गे रुग्णांना हलविणे शक्य नसल्याने एसडीआरएफच्या जवानांनी बोटीच्या साहाय्याने दोन्ही रुग्णांना नदीपार नेले.

रुग्णांना हेमलकसा येथे सुरक्षित पोहोचवल्यानंतर तेथून रुग्णवाहिकेद्वारे अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारांसाठी रवाना करण्यात आले. त्यामुळे पूरस्थितीत अडकलेल्या रुग्णांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
प्रशासनाकडून पूरस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पूर आलेल्या नदी-नाल्यांमधून तसेच पाण्याखाली गेलेल्या पुलांवरून जाण्याचा प्रयत्न करू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading