Saturday, September 26, 2026
Latest NewsPUNE

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महात्मा गांधीचे स्मारक सत्वर व्हावे..! – पुतळा स्मारक समिती’ची मागणी

पुणे | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य परिसरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, या मागणीसाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी स्मारक समितीच्या शिष्टमंडळाने आज विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांची भेट घेतली. यावेळी समितीच्या सदस्यांनी महात्माजींचा पुतळा उभारणीसंदर्भातील आपली भूमिका आणि मागणी कुलगुरूंसमोर मांडली.

पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत (मार्च २०२५ तसेच फेरप्रस्ताव २०२६) च्या मान्यप्राप्त ठरावानुसार, भारतीय स्वातंत्र्याचे जननायक राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळा उभारणीसंदर्भात ठराव मंजूर झालेले असतानाही, त्यावर अद्याप कोणतीही प्रत्यक्ष कार्यवाही झालेली नसल्यामुळे, असंख्य पुणेकर नागरिक, संस्था आणि संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या म. गांधी स्मारक समितीच्या शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेतली आणि अधिसभेने मंजूर केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करून पुतळा उभारणीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी केली.

यावेळी कुलगुरू मा. प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी समितीच्या सर्व सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यासंदर्भात त्यांनी पुतळा उभारणीसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबी लवकरात लवकर पूर्ण करून, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्मारक उभारण्याच्या दृष्टीने सत्वर कार्यवाही करण्यात येईल, असे सकारात्मक आश्वासनही मा. कुलगुरू डॉ. गोसावी यांनी दिले.
स्मारक समितीने आपली भूमिका मांडताना प्रतिपादन केले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारख्या ज्ञानकेंद्रात, विश्वमानव असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा उभारला जाणे ही विद्यापीठाच्या दृष्टीनेही गौरवाची गोष्ट आहे. कुलगुरूंच्या कार्यकाळात हा पुतळा उभारला गेला, तर पुणे विद्यापीठासाठी व विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरासाठी ती आनंद व अभिमानाची बाब असेल, असेही समिती सदस्यांनी नमूद केले.

आजच्या जगभरातील सामाजिक परिस्थितीत, महात्मा गांधीजींचे सत्य, अहिंसा, सामाजिक सलोखा आणि मानवतेचे विचार समाजापर्यंत पोहोचणे गरजेचे असून, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या ‘पुणे शहरास’ स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी’च्या वास्तव्याची पार्श्वभूमी देखील असल्याकडे समितीने लक्ष वेधले. समाज क्रांतिकारकांचे, ऐतिहासिक राष्ट्रपुरूषांचे आणि महात्मा गांधीचे गुरू असलेल्या डॅा. गोपाळकृष्ण गोखले यांची भूमी असलेल्या शहरात, पुणे विद्यापीठासारखे हे जगप्रसिद्ध ज्ञानकेंद्र असल्यामुळे, अशा विद्यापीठाच्या परिसरात ‘महात्मा गांधीजींचे स्मारक’ आणि “अध्यासन” उभे राहणे हे निश्चितच कालोचित ठरेल, अशी भूमिकाही समितीने यावेळी मांडली.

या भेटीत “राष्ट्रपिता महात्मा गांधी स्मारक समिती”चे अध्यक्ष उल्हासदादा पवार, अन्वर राजन, गोपाळदादा तिवारी, डॅा हर्ष जगझाप, प्रशांत कोठडिया, महावीर जोंधळे व सौ इंदुमती जोंधळे, नितीन पवार, सिद्धांत जांभुळकर, राहुल गुरधे, अभिजीत मंगल, बाळासाहेब पवार इ सदस्य उपस्थित होते.
महात्मा गांधी स्मारक समितीने, पुतळा उभारणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या विषयाचा पाठपुरावा सुरू ठेवण्याची भूमिका व्यक्त केली असून, त्याअनुषंगाने शासकीय पातळीवर सर्वोतापरी सहकार्य करण्याची तयारी देखील दर्शवली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading