जरांगेंचा इशारा; शिवसेना शिंदे गटाचा शेतकरी मेळावा वादाच्या भोवऱ्यात
परभणी प्रतिनिधी
परभणीत शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत दाखल झालेले खासदार संजय जाधव यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठा आरक्षण आंदोलन अंतरवली सराटी येथे सुरू असल्याने या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी हा मेळावा रद्द करण्याची मागणी करत खासदार संजय जाधव यांना थेट संपर्क साधला आहे.
मनोज जरांगे यांनी संजय जाधव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून शेतकरी मेळावा रद्द करण्यास सांगितले. मेळावा रद्द केला नाही तर आपण स्वतः कार्यक्रमस्थळी येऊ, असा इशाराही जरांगे यांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आधीच जोरदार तयारी सुरू असलेल्या या कार्यक्रमाबाबत आता उत्सुकता आणि राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
खासदार संजय जाधव यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या शेतकरी मेळाव्याची गेल्या काही दिवसांपासून जय्यत तयारी सुरू आहे. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहावेत, यासाठी स्थानिक पातळीवर नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला राजकीयदृष्ट्याही महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, मनोज जरांगे यांच्या इशाऱ्यामुळे मेळाव्याचे स्वरूप बदलणार का, कार्यक्रम पुढे ढकलला जाणार का किंवा तो नियोजित वेळापत्रकानुसारच होणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, जरांगे यांनी कार्यक्रमस्थळी येण्याचा इशारा दिल्याने आयोजकांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
संजय जाधव यांनी शिवसेना ठाकरे गटाशी फारकत घेत शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर परभणीच्या राजकारणात त्यांची भूमिका चर्चेत राहिली आहे. आता त्यांच्या शेतकरी मेळाव्याला मनोज जरांगे यांनी विरोध दर्शवल्याने या कार्यक्रमाकडे केवळ शेतकरी मेळावा म्हणून नव्हे, तर राजकीयदृष्ट्याही पाहिले जात आहे.
दरम्यान, कार्यक्रमासाठी करण्यात आलेली तयारी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नियोजित उपस्थिती आणि मनोज जरांगे यांनी दिलेला इशारा या पार्श्वभूमीवर परभणीतील हा शेतकरी मेळावा अखेर होणार की रद्द केला जाणार, याकडे आता जिल्ह्यातील राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे.
