Friday, October 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

चारित्र्याच्या संशयातून गर्भवती प्रेयसीचा विषप्रयोग करून खून; चेंबूरमध्ये प्रियकराला अटक

मुंबई : चेंबूरमधील आरसीएफ परिसरात चारित्र्यावर संशय घेत प्रियकराने गर्भवती प्रेयसीला विषारी पदार्थ मिसळलेले शीतपेय पाजून तिचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरसीएफ पोलिसांनी आशिष मगर याला अटक केली असून न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मृत विष्णूमाया ही मूळची नेपाळची असून ती आणि आरोपी आशिष मगर चेंबूरमधील मैसूर कॉलनीतील बंगला क्रमांक ५७-ए येथे घरकाम करत होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. विष्णूमाया सुमारे अडीच महिन्यांची गर्भवती होती.

मात्र, आशिषला विष्णूमायाच्या चारित्र्याबाबत संशय होता. तिचे दुसऱ्या तरुणासोबत संबंध असल्याचा तसेच तिच्या पोटातील बाळ आपले नसल्याचा संशय त्याला होता. या कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
२५ ऑगस्टच्या रात्री दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यानंतर आशिषने थम्स अप या शीतपेयात नॅप्थालिनच्या गोळ्या मिसळून ते विष्णूमायाला प्यायला दिल्याचा आरोप आहे. शीतपेय प्यायल्यानंतर तिला उलट्या होऊ लागल्या आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला.

घटनेनंतर आशिषने विष्णूमायाचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. मात्र, सुरुवातीपासूनच त्याच्या हालचाली आणि जबाबांवर पोलिसांना संशय होता. चौकशीत त्याच्या जबाबांमध्ये विसंगती आढळून आल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली.
चौकशीदरम्यान आशिषने विष्णूमायाला विषारी पदार्थ दिल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे त्याला अटक करण्यात आली. घटनेनंतर चार दिवसांनी संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आरसीएफ पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading