मराठा आरक्षणाच्या दाखल्यांबाबत सरकार गंभीर
राधाकृष्ण विखे पाटील यांची जरांगे पाटलांना ग्वाही
जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विविध मागण्यांची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, पात्र लाभार्थ्यांना आरक्षणाचे दाखले मिळण्यात येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राजकीय हस्तक्षेपामुळे पात्र व्यक्तींचे दाखले रद्द होणे किंवा नाकारले जाणे योग्य नसून, भविष्यात असा प्रकार होऊ नये यासाठी वरिष्ठ पातळीवरून लक्ष दिले जात असल्याची माहिती मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून पुन्हा उपोषण करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या शिष्टमंडळाने सोमवारी अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. या शिष्टमंडळात राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई आणि आमदार प्रसाद लाड यांचा समावेश होता.
बैठकीनंतर विखे पाटील यांनी सांगितले की, दाखले नाकारले जात असल्याच्या तक्रारींमुळे समाजात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन प्रमाणपत्रांबाबतच्या त्रुटी दूर केल्या जातील.
काही ठिकाणी अधिकारी योग्य पद्धतीने काम करत नसल्याच्या जरांगे पाटील यांच्या आरोपांबाबतही सरकारने गंभीर भूमिका घेतल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले. काही प्रकरणांत एकाच कुटुंबातील एका व्यक्तीला दाखला मिळतो, तर दुसऱ्या व्यक्तीचा अर्ज नाकारला जात असल्याच्या तक्रारी आहेत. अशा प्रकरणांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल. गरज पडल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या निलंबनाचीही कार्यवाही होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही या विषयाकडे बारकाईने लक्ष असून सरकार मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी नियमांच्या चौकटीत राहून पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळेल, अशा पद्धतीने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, २९ ऑगस्टपासून जरांगे पाटील यांनी आंदोलन पुकारल्याने सरकारसमोर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आंदोलनापूर्वी दाखल्यांशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाकडून हालचालींना वेग आला आहे.
